नाही.....ती आत्महत्या करणारच नाही 

suicide
suicide

आरती पाटीलच्या मैत्रिणींची भावना; थोडीशी अपसेट होती हे नक्कीच

कोल्हापूर - "नाही.....ती आत्महत्या करणारच नाही. इतकी वर्ष माझी मैत्रीण आहे. कधी कुठल्या परिस्थितीत तिला "गिव्ह अप' केलेलं पाहिलं नाही. इकडे आलेली तेव्हा भेटलो होतो. त्यावेळी "अपसेट' दिसत होती. सासू त्रास देते म्हटली; पण तिच्या बोलण्यावरून आत्महत्या करेल असं वाटलं नाही.' 

"हो अगं.....पटतंच नाही की ती आता नाही. आणि आत्महत्या तर शक्‍यच नाही. तिच्या सासरच्या छळामुळेच झालं सगळं. यावेळेस आलेली तेव्हा तिची तब्येत पण खालावली होती. नणंदेचा फोन आला तरी सासरी जायला तयार नव्हती. ती गेली आणि दोन-तीन दिवसांत हे ऐकायला मिळालं.' 
नाशिकमध्ये हुंडाबळी ठरलेल्या आरती पाटील-सावकार हिच्या मैत्रिणी चिडून पण हळू आवाजात बोलत होत्या. मैत्रिणींवरील अन्यायाबाबतची चीड त्यांच्या भावनेतून स्पष्ट होत होती. मधून-मधून ओघळणाऱ्या आसवांमुळे सगळ्यांचे डोळे लाल झाले होते. आरतीच्या घराच्या शेजारी राहणारे खात्रीने "ही आत्महत्या नाहीच' हेच बजावत होते... 

लग्नानंतर सासरी छळ होत असतानाही आरतीने सासरकडून होणारी हुंडा आणि सोन्याची मागणी स्पष्ट नाकारली. ती उच्चशिक्षित होती. पण ही एका आरतीची गोष्ट नाही. अशा अनेक "आरती' आपल्या आजूबाजूला आहेत. सुशिक्षित आणि अशिक्षित कुटुंबांमध्येही हा प्रश्‍न सारख्याच प्रमाणात आहे. काही जणी माहेरी परत येतात तर काहीजणी मूकपणे सहन करत राहतात. छळामुळे प्राणास मुकावे लागल्यानंतर सर्वांना जाग येते. तीही तात्पुरत्या स्वरूपाची. थोड्या दिवसांनी पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' म्हणत हुंड्याची प्रथा चालूच राहते. बळी गेल्यानंतर हळहळत बसण्याऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्‍यक आहे. "मुलीचे आई-वडील' हा कमीपणा मानू नये. मुलीचे लग्न ओझे न मानता लग्न करतेवेळी घाई-गडबडीत निर्णय न घेता मुलीच्या होणाऱ्या सासरच्या मंडळींची मानसिकता पडताळून पाहावी. मानसिकता बदलणेच महत्त्वाचे आहे. तसेच पैशाच्या जोरावर कायद्याच्या कचाट्यातून सुटणाऱ्या धनदांडग्यांचा वेळीच बंदोबस्त होणे गरजेचे आहे. 



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com