नियमित सेवा दिली तरच मिळते मानधन

नंदिनी नरेवाडी
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - गावात कोणत्या घरात गरोदर माता आहे ती शोधायची, चार-पाच किलोमीटरची रोज पायपीट करीत संबंधित गरोदर मातेची नोंद घेऊन तिला नियमित उपचार घेण्याविषयी माहिती देत, तिला नियमितपणे आरोग्य केंद्रावर नेऊन उपचार करून आणायचे, प्रसूतीसाठी वेळीच दवाखान्यात न्यायचे. प्रसूतीनंतरही तिची व बाळाची काही दिवस काळजी घ्यायची. एवढे करून एका गरोदर मातेसोबत आशा कर्मचाऱ्याला सरासरी दीड हजार रुपये मिळतात. तेही फक्त अनुसूचित जाती-जमाती व दारिद्र्यरेषेखालील गरोदर मातांना सेवा दिल्यानंतर मानधन मिळते. अशा महिलांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे आशा कर्मचाऱ्यांचे मानधनही कमी होते. 

क्षय रुग्ण शोधणे, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे, लसीकरणाचे कार्यक्रम राबविण्याच्या मोबदल्यात तुटपुंजे मानधन आशा कर्मचाऱ्यांना मिळते. 

पण कोणत्या कामाचा किती मोबदला याची त्यांना माहिती नसल्याने शहरातील जवळपास १०० आशांना त्यांचा योग्य मोबदला मिळत नसल्याचे चित्र आहे. शहरातील आशा कर्मचाऱ्यांसाठी गटप्रवर्तक नसल्याने त्यांना योग्य त्या मानधनासोबतच कामाची योग्य ती माहिती मिळत नाही.

‘आशां’च्या कामाची दिशा ठरविण्याबरोबरच त्यांच्या कामांचा योग्य तो मोबदला त्यांना मिळण्यासाठी गटप्रवर्तक काम करतो. पण सध्या शहरात गटप्रवर्तक नसल्याने आशा कर्मचाऱ्यांचे काम विस्कळीत झाले आहे. शहरात आशा कर्मचाऱ्यांची १२ केंद्रे आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून १०० पेक्षा जास्त आशा कर्मचारी कार्यरत आहेत. या आशा कर्मचाऱ्यांचे काम सुरळीत चालावे याकरिता गटप्रवर्तक असणे गरजेचे आहे. पण गटप्रवर्तकच नसल्याने त्यांचे काम विस्कळीत होत आहे. २० आशा कर्मचाऱ्यांमागे एक गटप्रवर्तक असावा, असा नियम आहे. मात्र शहरातील परिस्थिती पाहता १०० आशा कर्मचारी असून एकही गटप्रवर्तक नसल्याने कामाचा ताळमेळ राखणे शक्‍य होत नाही.

असे मिळते मानधन 
अनुसूचित जाती-जमाती व दारिद्र्यरेषेखालील महिलांना प्रसूतीपूर्व सेवा दिल्यानंतर ३०० रुपये आणि प्रसूतीनंतर सेवा दिल्यानंतर आशा कर्मचाऱ्यांना ३०० रुपये मिळतात. पण अशा महिला मिळत नसल्याने महिन्याला सरासरी दीड हजार रुपये मानधन मिळते. तेही अनियमित स्वरूपाचे असते.

आशा कर्मचाऱ्यांना साहित्य व उपकरणे तसेच यावर्षीची मार्गदर्शक सूचना उपलब्ध न झाल्याने कोणत्या कामाचा काय मोबदला याची माहितीच आशा कर्मचाऱ्यांकडे नाही. ग्रामीण भागातील आशा कर्मचाऱ्यांची तीन प्रशिक्षण पूर्ण झाली तरी शहरातील आशा कर्मचाऱ्यांसाठीचे एकही प्रशिक्षण पूर्ण झालेले नाही.  
- नेत्रदिपा पाटील, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियन

Web Title: Aasha Employee Honorarium