बलात्कारातील आरोपी असल्याचे सांगून केले अपहरण... 

Kidnapping
Kidnapping

सोलापूर : हैदराबाद-पुणे शिवशाही बसमध्ये (एमएच - 14, जीडी - 9614) उमरगा येथून प्रवास करणारा प्रवासी बलात्काराच्या आरोपातील गुन्हेगार असल्याचे सांगून, बोरामणी गावाच्या शिवारात बस थांबली असताना सहा-सात जणांनी बसमधून रोहन ऊर्फ मुन्ना खुने यांना खाली उतरवले. मात्र, खुने यांना ताब्यात घेणाऱ्या संबंधित व्यक्‍ती पोलिस नसल्याचा संशय आल्याने बसचे वाहक प्रवीण जाधव यांनी तालुका पोलिस ठाण्याला माहिती कळविली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडून खुने यांची सुटका केली. 

उमरगा येथून शिवशाही बसमधून रोहन खुने हे सोलापूरकडे येत होते. बुधवारी (ता. 4) दुपारी पावणेचारच्या सुमारास बस बोरामणी गावाच्या शिवाराजवळ आली. तत्पूर्वी, खुने यांच्यासमवेत बसमधून दुसरी व्यक्‍ती प्रवास करीत होती. ती व्यक्ती बसचे लोकेशन संबंधित सहकारी आरोपींना फोनवरून सांगत होती. सहा-सात जणांनी बोरामणीजवळ बस अडवली आणि पोलिस असल्याचे सांगून खुने यांना बळजबरीने खाली उतरवले. 

पिंपरी - चिंचवड आगारातील हैदराबाद - पुणे शिवशाही बसच्या वाहकाला संशय आल्याने त्यांनी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वाहकाने सांगितल्याप्रमाणे चारचाकी वाहनाचा शोध सुरू केला; मात्र ती कार मुंबईतील असल्याचे समोर आले. तेथील पोलिसांशी संपर्क साधून कारच्या क्रमांकावरून मूळ मालकाचा शोध घेतला. त्यानंतर अपहरण झालेली व्यक्‍ती उस्मानाबाद येथील असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि काही तासांतच आरोपी शेषपाल राठोड (रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर) याचा साथीदार राहुल अर्जुन राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर रोहन खुने यांची सुटका झाली. संशयित आरोपी राहुल राठोड याला रविवारपर्यंत (ता. 8) पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

उर्वरित आरोपींचा शोध सुरू 
पैशाच्या देवाण - घेवाणीवरून रोहन खुने यांचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. पोलिस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलिस निरीक्षक देवडे, दीपक दळवी, नासिर शेख, सुहास पवार, सय्यद, कोरे, खांडेकर, फडतरे, बिराजदार, हाटखिळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आता पोलिसांनी उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com