डोक्‍याला पिस्तुल लावून  "त्यांना' पहाटेच पळविले 

सूर्यकांत वरकड
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे आज पहाटे सर्जेपुरा परिसरातील बेलदार गल्ली येथील शाळेजवळ पाठीमागून लाल रंगाच्या मोटारीत आलेल्या चौघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण केले. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

नगर : शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे आज पहाटे सर्जेपुरा परिसरातील बेलदार गल्ली येथील शाळेजवळ पाठीमागून लाल रंगाच्या मोटारीत आलेल्या चौघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण केले. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

अधिक माहिती अशी, हुंडेकरी उद्योजक समूहाचे सर्वेसर्वा करीम हुंडेकरी दररोज एसटी कॉलनीजवळील मशिदीमध्ये पहाटे नमाज पठण करण्यासाठी जातात. आज पहाटे नेहमीप्रमाणे ते नमाज पठण करण्यासाठी सर्जेपुरा येथील बेलदार गल्ली येथून निघाले होते. महापालिकेच्या शाळेजवळून जात असताना पाठीमागून अचानक पांढऱ्या रंगाची एक मोटारकार आली.

त्यात मोटारीतून चौघे खाली उतरले. त्यांच्या तोंडाला मास्क बांधलेले होते. त्यांनी हुंडेकरी यांना मोटारीत ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची चांगलीच झटापट झाली. त्या चौघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून हुंडेकरी यांना मोटारीत बसविले. ही घटना परिसरातील एका महिलेने पाहिली. यावेळी आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिक जागे झाले. परंतु, तोपर्यंत ती मोटार कोठला स्थानकाच्या दिशेने जोरात निघून गेली.

त्यानंतर औरंगाबाद-पुणे रस्त्यावरून ती मोटार पसार झाली. काही लोकांनी त्या मोटारीचा पाठलाग केला. परंतु, कोठला येथील रस्त्यावर गेल्यानंतर ती मोटार वाऱ्याच्या वेगासह निघून गेली. हुंडेकरी यांच्या अपहरणाबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला.

सर्वत्र नाकेबंदी करून तोफखाना, कोतवाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस तपासासाठी रवाना झाले. दरम्यान, या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दुपारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

सीसीटीव्ही फूटेज ताब्यात 
तोफखाना पोलिसांनी त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेच ताब्यात घेतले असून, त्यात एक पांढऱ्या रंगाचे वाहन पोलिसांना जाताना दिसत आहे. परंतु, अस्पष्ट दिसत असल्याने ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. 

शहरात खळबळ 
हुंडेकरी यांचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्जेपुरा, कोठला, झेंडीगेट, मुकुंदनगर परिसरासह शहरात पसरली. काही लोकांनी तत्काळ सर्जेपुरा भागात धाव घेतली. 

गुन्हेगारांचेच कृत्य 
उद्योजक करीम हुंडेकरी यांचे गेल्या अनेक दिवसांपासून उद्योजक क्षेत्रात मोठे नाव आहे. त्यांचे अपहरण नेमके कोणी आणि कशासाठी केले असावे? याचा शोध पोलिस करीत आहेत. मात्र, हुंडेकरी यांचे अपहरण गुन्हेगारी प्रवृत्तीच्याच लोकांनी केले असावे, असा अंदाजही वर्तवितण्यात येत आहे. 

पथके रवाना 
घटनेची माहिती मिळाल्यापासून पोलिसांची चार पथके शोधासाठी रवाना करण्यात आली आहे. लवकरच धागेदारे हाती लागतील. 
- संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक, नगर शहर 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abductor kidnapped from town