Vidhan Sabha 2019 कऱ्हाड उत्तरला बंडखोरी ; साताऱ्यात अभिजीत बिचुकले रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

आज (साेमवार, ता. साता) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हाेता.

कऱ्हाड  : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर नेते मनोज घोरपडे यांनी अपक्ष भरलेला आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघात आता विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी), धैर्यशील कदम (शिवसेना) अशी तिरंगी लढत होईल. या मतदारसंघात सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

या मतदारसंघातून आमदार बाळासाहेब पाटील हे चार वेळा विजयी झाले आहेत. ते पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातून मनोज घोरपडे हे भाजपमधून सक्रिय होते. कॉंग्रेसचे धैर्यशील कदम हे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ सेनेला गेला. कदम यांनी नुकताच सेनेत प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली. आता मनोज घोरपडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने येथे तिरंगी लढत होणार आहे.
 

कऱ्हाड दक्षिणला तिरंगी लढत 
कऱ्हाड दक्षिण ः माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (कॉंग्रेस आघाडी), डॉ. अतुल भोसले (भाजप- महायुती), ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर (रयत संघटना, अपक्ष).
 
या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर डॉ. अतुल भोसले यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. याच मतदारसंघात माजी विधी व न्याय मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने येथील लढत तिरंगी होईल. या मतदारसंघात एमआयएमचे अल्ताफ शिकलगार, बळीराजा पक्षाचे पंजाबराव - पाटील, बसपचे आनंदा थोरावडे आदी असे एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजेंना पवार, बिचुकलेचे आव्हान

सातारा विधानसभा मतदारसंघात सागर भिसे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या मतदारसंघात सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे दीपक पवार यांच्यात दुरंगी लढत होईल. याच मतदारसंघातून अभिजित बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. या मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे हे आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर तीन वेळा निवडून आले आहेत. भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशानंतर दीपक पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत जाणे पसंत केले. आता त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंपुढे आव्हान उभे केले आहे. गेल्या निवडणुकीत पवार यांचा शिवेंद्रसिंहराजेंनी पराभव केला होता.

फलटणला पारंपरिक लढत
 
फलटण विधानसभा मतदारसंघात पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी आमदार दीपक चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि दिगंबर आगवणे (भाजप) यांच्यातच लढत होईल असे चित्र आहे. 

या मतदारसंघात रामराजे व संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली दीपक चव्हाण यांनी दोन वेळा विजय मिळविला आहे. या मतदारसंघात आता एकूण 11 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.पाटणला देसाई विरुद्ध पाटणकर 
पाटण विधानसभा मतदारसंघात आमदार शंभूराज देसाई (शिवसेना) आणि सत्यजितसिंह पाटणकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) अशी पारंपरिक लढत होणार हे निश्‍चित झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhijeet Bichukale to contest vidhan sabha election from satara