गर्भपाताची गोळी, इंजेक्‍शन जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

सांगली - म्हैसाळ (ता. मिरज) येथे गेल्या काही वर्षांपासून भ्रूणहत्या करणारा क्रूरकर्मा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या पत्नीला पोलिसांनी आज चौकशीसाठी ताब्यात घेतले. खिद्रापुरेची कसून चौकशी सुरूच आहे. त्याच्या दवाखान्यात गर्भपातासाठी दिली जाणारी औषधे आणि इंजेक्‍शन पोलिसांनी जप्त केले आहे. हीच औषधे आणि इंजेक्‍शन स्वाती जमदाडे या महिलेला दिले होते. त्यात तिचा मृत्यू झाला होता. खिद्रापुरेविरुद्ध दाखल गुन्ह्यांत एमटीपी ऍक्‍ट, मुंबई नर्सिंग होम ऍक्‍ट, पुरावा नष्ट करणे, फसवणूक आदी कलमे वाढवण्यात आली आहेत. 

तपासाबाबत माहिती देताना अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले, ""भ्रूणहत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. मुख्य आरोपी बाबासाहेब खिद्रापुरे याची पोलिस कोठडीत कसून चौकशी करण्यात आली. त्याने मृत स्वाती जमदाडे हिचा गर्भपात करताना जी गोळी दिली. त्या गोळ्यांचा साठा पोलिसांनी पंचासमक्ष जप्त केला आहे, तसेच "अनवॉन्टेड किट' नावाने असलेल्या पाकिटातील "इंजेक्‍शन आयपी लेबरजीन' हे फोडलेले इंजेक्‍शन जप्त केले. सिव्हिल सर्जन आणि आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार एमटीपी ऍक्‍ट (वैद्यकीय गर्भपात कायदा), मुंबई नर्सिंग होम ऍक्‍टनुसार खिद्रापुरेविरुद्ध कलमे वाढवली आहेत. पुरावे नष्ट करणे आणि इतरबाबीनुसारही गुन्ह्याची कलमे वाढवली आहेत.'' 

ते म्हणाले, ""काल अटक केलेला डॉ. रमेश व्यंकटेश देवगिरीकर आणि गर्भपातासाठी औषधे पुरवणारा होलसेल विक्रेत्याकडील कामगार सुनील काशिनाथ खेडेकर याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली. तपास अतिशय शीघ्रतेने व सखोलपणे सुरू आहे. खिद्रापुरेच्या पत्नीचा गुन्ह्यात कितपत सहभाग आहे याचा तपास केला जाणार आहे. यासाठीच तिला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. या गुन्ह्यात जे कोणी आरोपी असतील त्यांची गय केली जाणार नाही. गुन्ह्यात जे फरारी झाले असतील त्यांना पथके रवाना करून अटक केली जाईल.'' 

खिद्रापुरेविरुद्ध दाखल केलेली कलमे 
खिद्रापुरेविरुद्ध यापूर्वी सदोषमनुष्यवध, कलम 314, 315, 316 नुसार गुन्हे दाखल होते. आता एमटीपी ऍक्‍ट, मुंबई नर्सिंग होम ऍक्‍ट, पुरावा नष्ट करणे कलम-201, स्त्रीच्या संमतीविना गर्भपात-313, मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक-318, तोतयेगिरी- 419, फसवणूक-420, दस्तऐवजाचे बनावटीकरण-467, ठकवणूक करण्यासाठी बनावटीकरण-468 (34), महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्‍टिशनर्स ऍक्‍ट कलम 34 ही कलमे वाढवण्यात आली आहे. 

स्वातीच्या परवानगीविनाच गर्भपात 
गर्भपाताच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या स्वाती हिला दोन मुली आहेत. तिसऱ्यांदा गर्भ राहिल्यानंतर तिची गर्भलिंग निदान चाचणी करून घेण्यात आली. त्यात पुन्हा मुलगीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याने स्वातीला गर्भपात करून घेण्यास सांगितले; परंतु तिने त्याला नकार दिल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तिच्या संमतीविनाच गर्भपात केला म्हणून कलम 313 नुसार डॉक्‍टर व पतीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. 

Web Title: Abortion pill, injection seized