चंदगड तालुक्‍यातील सुमारे १५० मुलींना करावी लागते शिक्षणासाठी पायपीट

नंदिनी नरेवाडी
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

एसटी महामंडळ बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवासाचा लाभ देते, मात्र चंदगड तालुक्‍यातील काही गावांत जवळपास १५० मुलींना आंबेवाडी मार्गावर एसटीची दुपारची फेरी नसल्याने दररोज सहा ते सात किलोमीटरची पायपीट करावी लागते.

कोल्हापूर - एसटी महामंडळ बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवासाचा लाभ देते, मात्र चंदगड तालुक्‍यातील काही गावांत जवळपास १५० मुलींना आंबेवाडी मार्गावर एसटीची दुपारची फेरी नसल्याने दररोज सहा ते सात किलोमीटरची पायपीट करावी लागते. परिणामी काही मुलींनी शिक्षण अर्धवट सोडले आहे, त्यांची लग्ने झाली. एसटीची एक फेरी नसल्याने मुलींच्या शिक्षणाला खो बसत आहे. ही बाब विचारात घेता दुपारी साडेबारा ते दीड यावेळेत आणखी एखादी फेरी सुरू व्हावी, अशी इच्छा विद्यार्थिनींची आहे.

चंदगड तालुक्‍यात निवडणुकीचा दौरा करताना चालत गावी जाणाऱ्या विद्यार्थिनी भेटल्या. त्यांची रोजची पायपीट करताना होणारे हाल त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. पायपीट नको म्हणून मुलींनी शिक्षण सोडले. त्यांची लवकर लग्ने झाली आमचेही तसेच होणार की काय, याची सुप्त भीतीही त्यांनी व्यक्त केली. एसटीच्या अधिकाऱ्यांना त्यांचे दुःख केव्हा कळणार, असा प्रश्‍नही ठळक झाला, अशी स्थिती चंदगड तालुक्‍यातील आंबेवाडी, करंजगाव या गावांत आहे.

येथील मुलींचा शिक्षणासाठी हा रोजच संघर्ष. यातील आंबेवाडी गावात रोज एसटीच्या दोन फेऱ्या होतात. मुलींच्या शिक्षणाला गती देण्यासाठी बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासाचे पास दिले जातात. राज्यातील कित्येक मुली त्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात आहेत, मात्र चंदगडसारख्या दुर्गम भागातील अनेक गावांत एसटीच्या फेऱ्या कमी असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींची रोजच गैरसोय होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान कॉलेज सुटते, परंतु सायंकाळी साडेचारलाच एसटी असल्याने चालतच घरी जातात. वर्गातील, गावातील मैत्रिणी एकत्र आल्या की घरची वाट पकडतात.

साधारण दीड ते दोन तास चालल्यानंतर त्यांचा त्या दिवशीचा प्रवास संपतो. रोजची ही पायपीट नको म्हणून काहीजण घरीच थांबतात. अठरा वर्षे पूर्ण झाले की लगेच घरचे लग्न लावून देतात. या परिस्थितीमुळे अनेक जणींची लग्ने झालीत आणि शिक्षणाचा दरवाजा कायमचा बंद झाला आहे. ऊन, पाऊस, वारा यांची तमा न बाळगता शिक्षणाचा त्यांचा प्रवास सुरू आहे. 

मी अकरावीमध्ये शिकते. सकाळी कॉलेजला एसटीने जाते, परंतु दुपारी एसटी नाही. सायंकाळी साडेचारला एसटी तिही येईल की नाही, याची शाश्‍वती नाही. त्यामुळे चालतच घरी जातो. रोज साधारण सात किलोमीटर चालतो.
- माधुरी लाड,
आंबेवाडी (ता. हलकर्णी)

दुपारी कॉलेज सुटल्यानंतर एसटी लगेच मिळत नाही. त्यामुळे आम्ही रोजच चालत घरी जातो. साधारण सात किलोमीटरची पायपीट होते.
- गुलाबी लखुबा पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About 150 girls in Chandgad taluka walk every day for education