साताऱ्यात मूर्तींच्या उंचीकडे डोळेझाक 

साताऱ्यात मूर्तींच्या उंचीकडे डोळेझाक 

गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक उत्सवाचे स्वरूप देण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या आयुष्यातील काही वर्षे खर्च केली. त्यांच्या प्रयत्नांना साताऱ्यात काहीसे यश येत असताना आता "कृत्रिम नको पारंपरिकच तळे हवे,' असा सूर काल (गुरुवार) पालिकेच्या सभागृहात आळवला गेला. यात गणेश मंडळांचे कार्यकर्ते किती अन्‌ राजकीय किती, हा वेगळा भाग! विसर्जन तळ्याचा पेच असताना मूर्तींच्या 20-25 फूट उंचीबद्दल कोण अवाक्षरही काढायला तयार नाही. पालिका पदाधिकाऱ्यांना बहुदा मूर्तींच्या उंचीपेक्षा मंगळवार तळ्यातच विसर्जन करण्यात रस असावा. गुरुवारच्या बैठकीतील वातावरण तरी तसंच होतं ! 

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सातारा शहराचे पालकत्व असलेल्या नगरपालिकेचे पदाधिकारी व प्रशासन विसर्जन तळ्याच्या शोधार्थ वणवण करत आहेत. बैठकीत गणेश मंडळांचे कार्यकर्ते कमी अन्‌ राजकीय वक्तेच अधिक बोलले. मूर्ती विसर्जनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना इकडे साताऱ्यातील बैठकीत हात उंचावून बहुमत दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आला. गडकर आळी, बुधवार नाका या शहरातील प्रमुख कुंभारवाड्यांकडे एक चक्कर मारली तर लक्षात येईल, साताऱ्यातील काही मंडळांनी 18 ते 22 फूट उंचीच्या मूर्ती नोंदवल्या आहेत. या मूर्तींची संख्या 15 ते 18 आहे. पाच ते सात फूट उंचीची मूर्ती बसवणाऱ्या मंडळांचा कल यंदा अधिक मोठ्या आकाराच्या मूर्तीकडे वाढला आहे. पाच वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने शहर व परिसरातील मूर्तीकारांना मूर्तींच्या उंची व पीओपीबाबत समजपत्रे दिली होती. गेल्या वर्षी व यंदाही मूर्तीकारांकडे दुर्लक्षच झाले. उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला साताऱ्यातील मूर्तीविसर्जनाबाबत नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा प्रशासन पालिकेच्या भरवशावर राहिले. आजही जिल्हा प्रशासन मूर्तींच्या उंची, रासायनिक रंग तसेच प्लॅस्टर की शाडूमाती याबाबत तोंड उचकटायला तयार नाही. उलट पालिका प्रशासनाला पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे सल्ले दिले जात आहेत. उच्च न्यायालयात सुशांत मोरे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत जिल्हा प्रशासन ही एक पार्टी होते, कदाचित याचा विसर प्रशासनाला पडला असावा. 

तीन कृत्रिम तळी, पालिकेचा जलतरण तलाव ही मूर्ती विसर्जनाची चार ठिकाणे असतानाही मूर्ती विजर्सनासाठी पालिका नव्या जागेचा शोध घेत आहे. मूर्ती कायम ठेवणे अथवा फायबरची मूर्ती बसविण्याबाबत शहरात जागृती वाढली आहे. महागणपती समजल्या जाणाऱ्या सम्राटसारख्या मोठ्या मूर्तीची दीर्घ परंपरा लाभलेल्या मंडळाने जलप्रदूषणाचा विचार करत मूर्ती कायम ठेवण्याचा निर्णय अंमलात आणला. गणेश कार्यकर्त्यांमधील मूर्तीच्या उंचीची अव्यवहार्य स्पर्धा संपून परिवर्तनाचे वारे सुरू झाले असतानाच त्यामध्ये खंड पाण्याचे प्रयत्न काही लोकांकडून होताना दिसत आहेत. पाच वर्षांपूर्वी याच वृत्तींनी मंगळवार तळ्यात मूर्ती विसर्जनाचा आग्रह धरला. लोकांत संभ्रम निर्माण करण्यासाठी रात्रीच्या अंधारात येऊन तळ्यात काही मूर्तींचे विसर्जन करण्याचे प्रयत्न झाले. आज त्याच शक्ती पुन्हा बळावल्याचे साताऱ्यात चित्र आहे. न्यायालयीन आदेशाच्या काटेकोर अंमलबजावणीची जबाबदार असलेले जिल्हा प्रशासन यात भूमिका घेणार की, पालिकेच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणे लोकभावनेवर स्वार होऊन चाललंय त्याकडे दुर्लक्ष करणार, हे लवकरच स्पष्ट होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com