
पुढील शैक्षणिक वर्षाला 8 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तसेच फेब्रुवारीमध्ये महाविद्यालयांच्या परीक्षा पार पडणार आहेत
बेळगाव - राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गत (आरसीयु) येणाऱ्या महाविद्यालयांच्या 2021-22 च्या शैक्षणिक वर्षाला 8 मार्चपासून सुरुवात होणार आहे. 30 जूनपर्यंत हे वर्ग चालणार असून त्यानंतर परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यासंबंधी आरसीयुने युजीसी व कर्नाटक सरकारच्या नियमान्वये एक पत्रक प्रसिद्ध केले असून संबंधीत महाविद्यालयांना यासंधी सूचना करण्यात आल्या आहेत. या वेळापत्रकानुसार पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कोरोनामुळे पदवी व पदवीपूर्वी महाविद्यालये 24 मार्चपासून बंदच होती. सुमारे आठ महिन्यानंतर 17 नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. महाविद्यालये सुरु होऊन महिना उलटला तरी देखील फक्त 50 टक्केच विद्यार्थ्यांची हजेरी आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आरसीयुने पुढील शैक्षणिक वर्षाची रुपरेषा तयार केली आहे. यानुसार प्राध्यापकांना कामकाज करावे लागणार आहे.
कोरोनामुळे यंदा महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेला देखील विलंब झाला आहे. 2020-21 शैक्षणिक वर्षाची 1 ऑगस्टला सुरुवात झाली आहे. तसेच 1 ऑक्टोंबरपासून ऑनलाईन वर्गांना सुरुवात झाली. सध्या डिसेंबर सुरु असून अजूनही कोरोनाची खबरदारी घेऊन ऑनलाईन व ऑफलाईन वर्ग घेतले जात आहेत. महाविद्यालयातील 1, 3, आणि 5 व्या सेमिस्टरच्या वर्गाचा शेवट 31 जानेवारी 2021 असणार आहे. तसेच 1, 3 व 5 सेमिस्टरची मध्यावती सुट्टी, प्रॅक्टिकल परीक्षा, लिखित परीक्षा, मुल्यमापन व निकाल 25 जानेवारी 2021 ते 7 मार्च 2021 पर्यंत लागणार आहे. त्यानंतर 2, 4 व 6 व्या सेमिस्टर पदवी अभ्यासक्रमाच्या वर्गांची सुरुवात 8 मार्चला होणार आहे. तसेच 8 मार्च ते 30 जूनपर्यंत हे वर्ग चालणार आहेत. या सेमिस्टरची वार्षिक उन्हाळी सुट्टी, प्रॅक्टिकल परीक्षा, लिखीत परीक्षा, मुल्यमापण आदी काम 28 जून पासून 8 ऑगस्ट 2021 पर्यंत चालणार आहे. तर 2021-22 या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ 10 ऑगस्ट 2021 पासून होणार आहे.
पुढील शैक्षणिक वर्षाला 8 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तसेच फेब्रुवारीमध्ये महाविद्यालयांच्या परीक्षा पार पडणार आहेत. पुढील वर्षभरासाठीचे परीपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे. त्यानुसार प्राध्यापकांना नियोजन करायचे आहे.
-डॉ. डी. एन. मिसाळे, बी. के. कॉलेज
संपादन - धनाजी सुर्वे