'जलसंपदा'च्या निवृत्त अभियंत्याकडे कोट्यवधींचे घबाड

निवास चौगुले
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

आतापर्यंतच्या चौकशीत त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा 4 कोटी 14 लाख, 20 हजार 799 रूपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. ज्ञात उत्पन्नापेक्षा हे प्रमाण 68.11 टक्के आहे.

कोल्हापूर : शासकीय सेवेत असताना बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता व सहसचिव सुरेश लक्ष्मण तथा एस. एल. पाटील (वय 61, रा. हिम्मतबदाद्दूर परिसर, ताराबाई पार्क, मूळ गांव-कसबा बावडा) यांच्यासह त्यांची पत्नी सौ. विद्या व मुलगा विक्रांत यांच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्यानंतर श्री. पाटील यांच्या कोल्हापुरसह कसबा बावडा, पुण्यातील राजेंद्रनगर येथील घर व फ्लॅटवर लाचलुचपत विभागाने धाडी टाकल्या. आतापर्यंतच्या चौकशीत त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा 4 कोटी 14 लाख, 20 हजार 799 रूपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. ज्ञात उत्पन्नापेक्षा हे प्रमाण 68.11 टक्के आहे. या कारवाईने जलसंपदा विभागात एकच खळबळ उडाली आहे. 

श्री. पाटील हे 27 ऑक्‍टोबर 1980 रोजी जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर रूजु झाले. त्यानंतर पदोन्नतीने ते जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता झाले. 31 मे 2012 रोजी ते सेवानिवृत्त झाले. 32 वर्षाच्या सेवेत त्यांनी कोल्हापूरसह मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली आदि जिल्ह्यात विविध पदावर काम केले. मुंबईत मुख्य अभियंता पदावरून ते निवृत्त झाले. त्यानंतर वर्षभरातच त्यांच्याविरोधात निनावी तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीचा तपास लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केला. 

गेल्या तीन वर्षात श्री. पाटील यांनी कोल्हापुरात हिम्मतबहाद्दूर परिसर व राजेंद्रनगर परिसरातील सिंचन कॉलनी येथे दोन अलिशान भव्य बंगले बांधले आहेत. याशिवाय पुणे व मुंबई येथे एक अलिशान फ्लॅट आहेत. सांगली, सोलापूर येथे शेतजमीनही खरेदी केली आहे. कसबा बावडा या त्यांच्या मूळ गांवीही त्यांनी काही जमीन खरेदी केल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या विरोधात आज शाहुपुरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 13 (1)(ई) सह 13 (2) व भारतीय दंडसंहितेच्या कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक उदय आफळे करत आहेत. 

सकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने पोलीस बंदोबस्तात श्री.पाटील यांच्या हिम्मतबहाद्दूर परिसरातील बंगल्यासह राजेंद्रनगर, पुणे, मुंबईतील फ्लॅटची झडती घेतली. रात्री उशीरापर्यंत या झडतीचे काम सुरू होते. सध्या श्री. पाटील यांचे वास्तव्य कुटुंबासह हिंमतबहाद्दूर परिसरात आहे. ही वास्तूही त्यांनी पाच-सहा वर्षापुर्वी विकत घेतल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: ACB raid on retired Chief irrigation Engineer at Kolhapur, story by Niwas Chaugule