सोलापूर महापालिकेतील गटनेत्यांसाठी "अच्छे दिन' 

solapur
solapur

सोलापूर : महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील गटनेते बदलण्याच्या हालचाली व्हाव्यात, अशी अपेक्षा इच्छुकांकडून सुरू झाली असताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सध्याच्या गटनेत्यांच्याच बाजूने कौल देत या सर्वांचे आसन "स्थिर' असल्याचे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत फेरबदल नाहीच, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे तूर्त तरी महापालिकेतील सर्वच गटनेत्यांसाठी हे "अच्छे दिन' असणार आहेत. 

महापालिकेत कॉंग्रेसचे चेतन नरोटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किसन जाधव, बसपचे आनंद चंदनशिवे, एमआयएमच्या नूतन गायकवाड गटनेते म्हणून कार्यरत आहेत. 

माकपच्या कामिनी आडम एकमेव नगरसेविका आहेत. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर या चौघांची गटनेतेपदी निवड झाली. संकेतानुसार प्रत्येक वर्षी नवीन गटनेत्याची नियुक्ती व्हावी अशी अपेक्षा असते. निवडणुका होऊन आता दोन वर्षे होत आली आहेत, त्यामुळे गटनेते बदलावेत, असा इच्छुकांतून सूर निघत आहे. तथापि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षश्रेष्ठी बदलास तयार नाहीत. 
नरोटे यांचे दोन वर्षांतील काम व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक पाहता त्यांनाच मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. गटनेतेपदी वर्णी लागावी यासाठी ज्येष्ठ नगरसेवक शिवलिंग कांबळे, रियाज हुंडेकरी व बाबा मिस्त्री हेही प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही जाधव हेच राहण्याची शक्‍यता आहे. एमआयएमच्या गटनेतेपदी शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या नावाची चर्चा होती, मात्र विद्यमान नूतन गायकवाड याच तूर्त तरी गटनेतेपदी राहतील, असे त्यांनीच सांगितल्याने गायकवाड यांचेही आसन स्थिर राहणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमाणेच बसपच्या नगरसेवकांची संख्याही चार आहे आणि या गटाच्या नेतेपदी आनंद चंदनशिवे हेच राहणार, हे उघड आहे. 

गटनेतेपदाच्या बदलाबाबत तूर्त तरी चर्चा नाही. ज्या वेळी विषय चर्चेला येईल, त्या वेळी पाहता येईल. 
- प्रकाश वाले, शहराध्यक्ष, कॉंग्रेस 

चार नगरसेवक आहेत. सुनीता रोटे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. उर्वरित दोघे इच्छुक नाहीत. त्यामुळे किसन जाधव हेच आमचे गटनेते असतील. 
- भारत जाधव, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

गटनेता बदलासंदर्भात कोणत्याही सूचना श्रेष्ठींकडून आल्या नाहीत. पक्षातून मागणीही नाही. त्यामुळे नूतन गायकवाड याच गटनेत्या असतील. 
- तौफिक शेख, शहराध्यक्ष, एमआयएम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com