हातकणंगले वडगाव मार्गावर ट्रक जीपचा अपघात; एक बालिका ठार

अतुल मंडपे
रविवार, 19 मे 2019

एक नजर

  • कुंभोज फाट्यानजीक हातकणंगले वडगाव मार्गावर सकाळी सहाच्या सुमारास ट्रक आणि जीपची धडक.
  • अपघातामध्ये दोन वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू.
  • नऊजण जखमी. यातील चाैघांची प्रकृती गंभीर. 

हातकणंगले - कुंभोज फाट्यानजीक हातकणंगले वडगाव मार्गावर सकाळी सहाच्या सुमारास ट्रक आणि जीपची धडक झाली. या अपघातामध्ये दोन वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर नऊजण जखमी झाले आहेत. यातील चाैघांची प्रकृती गंभीर आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  पुणे येथून केमिकलचे साहित्य घेऊन दहा चाकी ट्रक ( क्र. MH १२ HD ५२९७ ) येथील केएटीपीपार्ककडे निघालेला होता.  या ट्रकशी नवदांपत्याला घेऊन जोतिबा दर्शनासाठी निघालेल्या जीपची ( क्र. KA ४८ M ६८२९ ) धडक बसली. या अपघातामध्ये दोन वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. 

शिवाली सिद्धाप्पा कुंभार (२, रा. सावळगी, ता. जमखंडी, जि. बागलकोट) असे मृत बालिकेचे नाव आहे. नीलिमा बसवराज कुंभार ( २५ ), बसवराज अशोक कुंभार ( ३० ), कावेरी सिद्दाप्पा कुंभार ( २५ ),राधिका भैराप्पा कुंभार (२८), भैराप्पा कुंभार (३२), रितेश सिद्वाप्पा कुंभार (९), निर्मला सुदेश कुंभार (३४ ), प्रेमावली दुर्गाप्पा कुंभार (४० ) व हाजिसाब मुत्ला ( ५७ ) सर्व रा. सावळगी,ता. जमखंडी अशी जखमींची नावे आहेत. 

वाहनांची धडक इतकी जोरदार होती की, ट्क उलटून चाके निखळून पडली होती तर जीपचा चक्काचूर झाला आहे. घटनांस्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. ट्रक रस्त्यांतच मध्येच पलटी झाल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.      

सावळगी येथील कुंभार कुटुंबिय जीपमधून नवदांपत्याला घेऊन जोतिबाला दर्शनांसाठी निघाले होते. पहाटे सहाचे सुमारास चालकाच्या डोळ्यावर झापड आल्याने समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Hatkanagale Vadgaon road one dead