संगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल 

संगमनगरजवळ अपघातांचे ब्लॅक होल 

सातारा - संगमनगर येथील कालव्याजवळ रस्ता रुंदीकरणातील कामाच्या खोळंब्यामुळे रस्त्यात अचानक झालेल्या बदलामुळे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे केंद्र बनले आहे. हे ब्लॅक होल जीवघेणे ठरण्यापूर्वीच तातडीने उपाययोजना राबविणे आवश्‍यक आहे. 

सातारा-पंढरपूर रस्त्याचे दुपदरी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तत्पूर्वी पोवई नाका ते संगमनगर रस्त्याचे रुंदीकरण झाले. हा रस्ता दुपदरी झाला आहे. संगमनगर येथील कालव्यावरील पुलाजवळ मात्र, हा रस्ता अद्याप रुंद झालेला नाही. त्यामुळे पोवई नाक्‍यावरून झालेल्या दुपदरी चांगल्या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने जातात. संगमनगर पुलाजवळ मात्र अचानक रस्त्याची स्थिती बदलत आहे. अचानक होणाऱ्या या बदलामुळे वाहनधारक बुचकाळ्यात पडत आहे. भरधाव वेगावर नियंत्रण मिळवणे अनेकांना शक्‍य होत नाही. त्यामुळे गाड्या थेट कालव्यात घुसण्याचे प्रमाण वाढत आहे. 

पुणे-बंगळूर महामार्गाच्या कामादरम्यानही संभाव्य अपघातांच्या धोक्‍यांचा विचार न करता रस्ते बांधणीचे नियोजन केले होते. त्यामुळे अजंठा चौकात मृत्यूचा सापळा तयार झाला होता. अनेकांना त्यात आपले जीव गमवावे लागले. त्यानंतरही नागरिकांचा उद्रेक झाल्यावर पोलिस प्रशासनाने ठाम भूमिका घेतल्यानंतर अजंठा चौकातील हा मृत्यूचा सापळा बंद करण्यात आला. त्याच पद्धतीने संगमनगर पुलावरही अपघातांचे ब्लॅक होल निर्माण झाले आहे. वास्तविक रस्त्यावर अशा प्रकारे अचानक बदल होत असताना तो दर्शविण्यासाठी बांधकाम विभागाने पुरेशी दक्षता घेणे आवश्‍यक असते. वाहनधारकांच्या लक्षात येईल असे दिशादर्शक फलक संबंधित ठिकाणाच्या फार अगोदर लावणे आवश्‍यक असते. वाहनांचे वेग या ठिकाणापर्यंत येण्यापूर्वीच नियंत्रणात येतील अशी उपाययोजनाही करणे आवश्‍यक असते. 

संगमनगर येथील कालव्याजवळ मात्र, अशा पुरेशा उपाययोजना संबंधित विभागाकडून करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वेगाने येणारी वाहने थेट कालव्यात जात आहेत. आजवर अनेक दुचाकीस्वारांची या ठिकाणी फसगत झाली आहे. नेहमीची सवय नसलेल्या अनेकांना या ठिकाणी बिचका पडतो. अशाच पद्धतीने काल रात्री एक कार थेट कालव्यात कोसळली. पाणीपुरवठ्याची पाइपलाइनमध्ये ही गाडी अडकल्यामुळे प्रवशांना फारशी दुखापत झाली नाही, अन्यथा कालचा अपघातच जीवघेणा ठरला असता. पुढील संभाव्य धोके टाळण्यासाठी या ठिकाणच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com