टॅंकरचालकावर लावले सलमान खानच्या केसमधील कलम! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑक्टोबर 2016

या प्रकरणी पोलिसांनी टॅंकरचालक रत्नप्पा धडके (रा. सावरगाव, ता. तुळजापूर) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता सलमान खानने केलेल्या अपघाताबद्दल ज्या कलमानुसार खटला चालला होता, त्याच 304 कलमानुसार हा खटलाही चालणार आहे. 

सोलापूर - पुणे महामार्गावरील पाकणी फाटा परिसरात थांबलेल्या टॅंकरला जीपची धडक होऊन चौघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी टॅंकरचालक रत्नप्पा धडके (रा. सावरगाव, ता. तुळजापूर) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता सलमान खानने केलेल्या अपघाताबद्दल ज्या कलमानुसार खटला चालला होता, त्याच 304 कलमानुसार हा खटलाही चालणार आहे. 

महामार्गावर टॅंकर थांबविल्याने अपघात होऊन एखाद्याचा जीव जाऊ शकतो, याची जाणीव असतानाही टॅंकरचालक रत्नप्पा धडके याने त्याचे वाहन थांबविले. 14 ऑक्‍टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली होती. अपघातात अक्कलकोट येथील नारायण आलोणे, गोकूळ आलोणे, सुलोचना आलोणे, प्रियांका आलोणे यांचा मृत्यू झाला होता. पुण्याला उपचारासाठी जाताना जीपने रस्त्यावर थांबलेल्या टॅंकरला मागून धडक दिली होती. या अपघातात वाहन चालविणारे ओंकार आलोणे हे गंभीर जखमी झाले आहेत. 

या अपघाताचा तपास पोलिस शिपाई सुनील चवरे यांच्याकडे देण्यात आला आहे. कोणत्याही अपघाताच्या खटल्यात 304 (अ) हे जामीनपात्र कलम लावले जाते. टॅंकरचालक धडके विरुद्ध सदोष मनुष्यवधाचे कलम लावल्याने न्यायदंडाधिकारी व्ही. एन. ठाकूर यांनी जामिनाचा अर्ज फेटाळून लावला आहे. याविरोधात आरोपीने जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी खटल्यात सदोष मनुष्यवधाचे अजामीनपात्र कलम लावून गंभीर चूक केल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील जयदीप माने यांनी केला आहे. 

आरोपी टॅंकरचालक धडके याच्यातर्फे ऍड. माने, ऍड. सिद्धेश्‍वर खंडागळे, ऍड. विकास मोटे तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर हे काम पाहात आहेत.

Web Title: accident on Pune-Solapur highway