
चारचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाला
नेर्ले (जि. सांगली)- येथील महामार्गावर दुपारी बाराच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाला. महादेव गुलाब भोरे (वय, ४५ रा. माळेवाडी तालुका पाथरी जिल्हा परभणी) असे गंभीर जखमी झालेल्या ऊसतोड कामगाराचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महादेव भोरे हे ऊसतोड कामगार म्हणून परिसरात काम करतात. ते दुपारी बाराच्या दरम्यान दुचाकी (क्रमांक एम एच २२ए बी २१७५) वरून काळमवाडीच्या दिशेने आशियायी महामार्ग ओलांडून नेर्लेकडे येत होते. मुख्य चौकाकडे जात असताना कोल्हापूरहून भरधाव वेगाने कराडकडे जाणाऱ्या चार चाकीने (क्र.एम एच १४ एच के ९५३३) महादेव भोरे यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. या धडकेत भोरे महामार्गावर आपटल्याने त्यांच्या कानाला, खांद्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी ॲम्बुलन्स बोलवून तात्काळ इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
हे पण वाचा - पतीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर धक्क्याने पत्नीचा मृत्यू
कार चालक बाळू कोंडीबा गुंजाळ (रा. पुणे )हे स्वतःहून कासेगाव पोलिसांत हजर झाले व त्यांनी अपघाताची फिर्याद दिली. महादेव गुलाब भोरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताची नोंद कासेगाव पोलिसात झाली आहे.
संपादन - धनाजी सुर्वे