
नगर-दौंड महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या निकृष्ट रस्त्यावर काही निवडणुकाही गाजल्या. काही नेत्यांनी राजकारणासाठी का होईना, रस्त्यावरचे खड्डे मोजून त्यांचा निवडणुकीतील भाषणांत विरोधकांना चपराक देण्यासाठी उपयोग केला.
श्रीगोंदे : नगर-दौंड महामार्ग आता वाढत्या अपघातांनी चर्चेत आला आहे. या महामार्गावरून प्रवास करताना जिवाचे काही खरे नाही, अशी भीती प्रवाशांना वाटू लागली आहे. गेल्या दोन वर्षांत महामार्गावर 29 प्रवाशांना जीव गमवावा लागला असून, 43 जण जखमी झाले आहेत. आता तरी सरकारने अपघात होण्याची कारणे शोधतानाच, प्रवाशांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक बनले आहे.
नगर-दौंड महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या निकृष्ट रस्त्यावर काही निवडणुकाही गाजल्या. काही नेत्यांनी राजकारणासाठी का होईना, रस्त्यावरचे खड्डे मोजून त्यांचा निवडणुकीतील भाषणांत विरोधकांना चपराक देण्यासाठी उपयोग केला. मात्र, आता हा रस्ता वाहतुकीसाठी चांगला झाल्याने, भरधाव जाणारी वाहने पाहून अनेकांच्या मनात धस्स होत आहे.
हेही वाचा कार दरीत कोसळून दोघे ठार
दुभाजकाचे वावडे
हा महामार्ग चारपदरी नव्हे, तर तीनपदरी असल्यामुळे मध्यभागी दुभाजक नाहीत. समोरून येणाऱ्या वाहनाच्या वेगाचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंसह मध्यभागी काही ठिकाणी पांढरे पट्टे मारले असले, तरी अनेक किलोमीटरचा भाग अजून तसाच आहे. दुचाकीस्वार रस्त्याच्या मध्य भागातून चालत असल्याने अडचणी येतात. रात्रीचे रस्त्याची बाजू लवकर लक्षात येत नसल्याने वाहनचालकांची तारांबळ उडते.
गतिरोधक नाही किमान रंबल स्क्रिप तरी
या महामार्गावरील गावे असणाऱ्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी पादचारी रस्ते ठेवले आहेत. मात्र, मध्यभागीचा मूळ रस्त्याचा आकार कमी करून हे पादचारी रस्ते झाले आहे. गावाच्या ठिकाणी दुचाकीसह चारचाकी मोटारी रस्त्याच्या कडेला लावल्या जात असल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. त्याही स्थितीत वाहनांची गती कमी होत नसल्याने अडचणी वाढतात. गतिरोधक महामार्गावर देता येत नसले, तरी रंबल स्क्रिप टाकले तरी वाहनचालकांना गतीचे भान होते. महामार्ग पोलिस अजूनही या रस्त्यावर दिसत नाहीत. त्यामुळे अपघात घडल्यानंतर स्थानिक पोलिसांनाच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. वाहनचालकांना पोलिसांचा धाक नसल्याने वेगाचीही भीती नसल्याचे लक्षात येते.
क्लिक करा दोन पोलिस लाचेच्या जाळ्यात
29 जण ठार, तर 43 जखमी
श्रीगोंदे व बेलवंडी पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 23 महिन्यांत या महामार्गावर 53 अपघात दाखल आहेत. त्यांत 29 जण ठार, तर 43 जण जखमी आहेत. अर्थात, अनेक अपघात पोलिसांपर्यंत येत नसल्याने यात जखमींची प्रत्यक्ष संख्या जास्त आहे.
चालकांनी गतीचे भान ठेवावे
ठेकेदाराने पांढरे पट्टे व रंबल स्क्रिप तातडीने टाकणे आवश्यक आहे. चालकांनीही वेगाचे भान ठेवावे. गावाच्या ठिकाणचे रस्त्यावरचे पार्किंग बंद न झाल्यास कारवाई करू.
- अरविंद माने, पोलिस निरीक्षक, बेलवंडी