तरुणीचे अपहरण झाल्याचा आरोप

 Accused of abducting a young girl
Accused of abducting a young girl

नगर : दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील विळद परिसरात काल (गुरुवारी) सायंकाळी एका विवाहित तरुणीचे अपहरण करून रेल्वे रुळावर टाकून ठार करण्याचा प्रयत्न झाल्याची फिर्याद पीडित तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटने संदर्भात पीडितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या तरुणीने तोफखाना पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून हे कृत्य झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांना या प्रकरणाच्या तपासात वेगळेच तथ्य समोर आल्याचे सूत्रांकडून समजते. 

मूळची पाथर्डी तालुक्‍यातील असलेलीही 29 वर्षीय तरुणी सध्या नगर शहराच्या उपनगरात राहते. तिला हातपाय बांधून, तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या अवस्थेत पोत्यात टाकण्यात आले. हे पोते रेल्वे रुळावर टाकण्यात आले होते. या तरुणीवर अत्याचार झाल्याचा संशयही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. 

याबाबत रात्री उशीरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या तरुणीने तोफखाना पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात धरून सहा जणांनी तिचे गुरुवारी अपहरण केले. तिला हात-पाय बांधून पोत्यात टाकले. ते पोते रेल्वे रुळावर टाकून देण्यात आले. या प्रकरणी पीडित तरुणीने काल (गुरुवारी) रात्री दिलेल्या फिर्यादीत तुषार अर्जुन वाघ, बंडू हिराजी मतकर, सुभाष कराळे, अर्जुन वाघ, अरुण मतकर, दिलीप नगरे (सर्व रा. जवखेडे, ता. पाथर्डी, जि. नगर) यांची नावे आरोपी म्हणून घेतली आहेत. 

विळद परिसरातील रेल्वे रुळावर एका तरुणीला हात-पाय बांधून पोत्यात टाकले होते. ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणीची पोत्यातून सुटका केली. तसेच विळद ग्रामपंचायतचे सदस्य संदीप जगताप, दगडू जगताप यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पवन सुपनर हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या तरुणीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, ही तरुणी गुरुवारी (ता. 21) गजानन कॉलनीत भाजी आणण्यासाठी गेली होती. त्याचवेळी एका चारचाकी वाहनातून चार जण आले त्यांनी माझे अपहरण केले असे तरुणीने उपस्थितांना सांगितले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सहा आरोपींनी शेंडी बाह्यवळण रस्त्यावरील वडगाव गुप्ता शिवारात एका कपड्याच्या दुकानाजवळ सायंकाळी सात वाजता अपहरण केले. अपहरण केलेल्या वाहनातच तिचे हात-पाय बांधून पोत्यात घालण्यात आले. ते पोते रेल्वे रुळावर टाकून देण्यात आले. 

पोलिस पथकाने या संदर्भात तपास सुरू केला आहे. या तपासात प्रथम दर्शनी हे अपहरण प्रकरण बनाव असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्‍त होत आहे. या संदर्भातील काही धागेदोरे एमआयडीसी पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांकडून समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com