विकृत मनोवृत्तीतूनच "श्रद्धांजली'चे कृत्य ; पालिका कर्मचाऱ्यांचे निवेदन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

मुख्याधिकाऱ्यांवर आरोप करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी होत आहेत, हेच दुर्दैवी आहे. त्या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये होणाऱ्या स्पर्धेत पुन्हा देशात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे असे पालिका कर्मचारी संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

कऱ्हाड  ः शहरातील सूर्यवंशी मळा परिसरात पालिकेच्या ड्रेनेज योजनेच्या कामादरम्यान झालेल्या अपघातास केवळ मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना जबाबादार धरून त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालून अज्ञात व्यक्तीने मंगळवार पेठेत केलेले कृत्य विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे. त्या कृतीचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत, अशा शब्दात पालिका कर्मचारी संघटनेने मुख्याधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या घटनेचा निषेध नोंदविला.
 
सूर्यवंशी मळा येथे काल ड्रेनेजचे काम सुरू असताना अपघात झाला. त्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोणी तरी अज्ञात व्यक्तीने मुख्याधिकारी डांगे यांच्या प्रतिमेला पुष्हार घालून मंगळवार पेठेतील एक खड्ड्यात श्रद्धांजली वाहण्याचा प्रकार केला. तो प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. त्याचा पालिका कर्मचारी संघटनेने निषेध केला आहे.

हेही वाचा -  मुख्याधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रकार

संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सूर्यवंशी मळा येथे काम सुरू असताना ठेकेदाराने पाइप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली. त्यात मंगळवार पेठेतील नागरिक विजय शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवी व दु:खदायक आहे. पालिका व आम्ही सर्व कर्मचारी शिंदे कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. घटनेबाबत शिंदे कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कृतीचा पालिका कर्मचारी संघटनेने केला निषेध

पोलिस त्याचा तपास करून दोषींवर कारवाई करतील. शहारातील सर्वच कामावरील ठेकेदारांना पालिकेने सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना आहेत. सर्वच कामांवर यापुढील काळात अपघात होऊ नयेत, याची दक्षताही घेण्यात येईल. मात्र, कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे कार्यतत्पर मुख्याधिकारी डांगे यांच्या छायाचित्राचा वापर करून अज्ञात व्यक्तीने मंगळवार पेठेत जे कृत्य केले, ते विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे. त्या कृतीचा आम्ही निषेध करत आहोत.

अपघाताची सामूहिक जबाबदारी

नगरपालिकेने दोन वर्षांत केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. ती मुख्याधिकारी डांगे यांच्या कुशल कामगिरी व अनुभवाच्या जोरावरच. त्यात नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचारी, कऱ्हाडकर नागरिक विशेषतः महिला यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, या यशाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही अपप्रवृत्तींकडून होत आहे. कऱ्हाडमध्ये घडलेल्या घटनांमध्ये केवळ मुख्याधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जात आहे. त्यांच्यावर विशिष्ट हेतूने आरोप होत आहेत. त्यातून त्यांची कामगिरी झाकोळण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक पालिकेच्या कामांवर घडलेले अपघात सामूहिक जबाबदारी आहे. मात्र, त्या घटनांवरून वारंवार नगरपालिका व मुख्याधिकारी यांना टार्गेट केले जात आहे, हे साफ चुकीचे आहे. 

अव्वल क्रमांकासाठी प्रयत्नशील 

तीन वर्षांत मुख्याधिकारी म्हणून काम करताना श्री. डांगे यांनी शहराचा लौकिक वाढवण्याचे काम केले. त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने घेतली आहे. नगरपालिकेला विविध पुरस्कारही मिळाले आहेत. पण, मुख्याधिकाऱ्यांवर आरोप करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी होत आहेत, हेच दुर्दैवी आहे. त्या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये होणाऱ्या स्पर्धेत पुन्हा देशात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी नगरपालिका आटोकाट प्रयत्न करत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An Act Of Tribute From A Distorted Mind