धूम्रपान करणाऱ्या 36 जणांवर दंडात्मक कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत सोलापूर शहर पोलिसांनी दिले होते.

सोलापूर : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांविरुद्ध सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांमार्फत कोटपा कायद्यांतर्गत मंगळवारी कारवाई करण्यात आली. शहर पोलिसांनी 23 जणांवर तर ग्रामीण पोलिसांनी 13 जणांवर कारवाई करत एकूण सात हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. 

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत सोलापूर शहर पोलिसांनी दिले होते. सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, नोडल ऑफिसर तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने एकूण 23 जणांवर कारवाई केली. चार हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला.

ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार आणि पोलिस निरीक्षक किशोर बावरे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ पोलिसांनी एकूण 13 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून दोन हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी कलम- चारनुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे.

Web Title: actiion against smoker in Solapur