नॉन कोविड रुग्णांवर उपचारास नकार दिल्यास रुग्णालयावर कारवाई : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी...जनता कर्फ्यू राहणार ऐच्छिक 

विष्णू मोहिते
Thursday, 10 September 2020

सांगली- नॉन कोविड रुग्णांवर उपचारास नकार देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करु, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला. जिल्ह्यात शुक्रवारपासून ( ता. 11) होणारा जनता कर्फ्यू हा ऐच्छिक असेल. कोणावरही बंधनकारक राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सांगली- नॉन कोविड रुग्णांवर उपचारास नकार देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करु, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला. जिल्ह्यात शुक्रवारपासून ( ता. 11) होणारा जनता कर्फ्यू हा ऐच्छिक असेल. कोणावरही बंधनकारक राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढती रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमिवर डॉ. चौधरी यांनी मंगळवारी जिल्ह्यात जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. त्यासंदर्भात आणखी काही मुद्दे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात नॉन कोविड रुग्णांवर उपचारासाठी टाळाटाळ केल्याच्या तक्रारी वाढत आहेत. सबंधित रुग्णालय व डॉक्‍टर यांच्याविरोधात तक्रार आल्यास तातडीने कारवाई केली जाईल. कोरोनाचा संसर्ग दिवसेदिंवस वाढतो आहे. त्याला आळा घालण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी आणि शारिरीक अंतर ठेवण्यासाठी जनता कर्फ्यू शिवाय आता पर्याय नाही. लोकांनीच आता स्वतःहून कामाशिवाय घराबाहेर पडण्याचे टाळले पाहिजे. समाजातील सर्व घटकांना माझ आवाहन आहे की त्यांनी घराबाहेर पडू नये. नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामीण मधील अनेक गावांनी पाळलेल्या जनता कर्फ्युमुळे सबंधित गावातील कोरोनाच्या फैलाव रोखण्यास मदत झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र जनता कर्फ्युचे महत्व अधोरेखित झालेले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनतेला संपूर्ण सहकार्य दिले जाईल.' 

पोलिस कारवाईबाबत विचारले असता जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले," पोलिसांना लॉकडाऊन काळात ज्या पध्दतीने अधिकार दिले होते तसे कोणताही अधिकार कर्फ्यू काळात देण्यात येणार नाही. मात्र मास्क, थुंकीसह अन्य सर्व नेहमीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. पोलिसांकडून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरता येणार नाही, असा प्रकार झाल्यास तो तातडीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. आपापली जबाबदारी ओळखून कमीत-कमी घराबाहेर पडून प्रशासनास कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करु या.'' 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले... 
0 प्लाझ्मा डोनेशनसाठी रुग्णांनी पुढे यावे 
0 क्रीडा संकुलात चार दिवसात कोविड सेंटर 
0 वैद्यकीय परीक्षांसाठी अटकाव नाही 
0 बॅंकांचे कामकाज सुरुच राहिल 
0 कृषी सेवा केंद्रांवरही पोलिसांनी दबाव आणू नये 
0 कोरोना रुग्णांना उपचारासाठी योग्य मार्गदर्शन 
0 कोरोना मयतांवर अत्यंसंस्काराचा पालिकेवर ताण 
0 यासाठी स्वयंसेवी संस्थांना पुढाकाराचे आवाहन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against non-covid patients for refusing treatment: Hospital Collector Chaudhary. People's curfew will be optional