देशांतर्गत गद्दारांवर व्हावी कारवाईः रजा मुराद

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 14 मे 2018

चित्रपटात राजकीय नेत्याची भूमिका करणे आणि प्रत्यक्षात नेता होणे याचा चांगला अनुभव धर्मेंद्र, गोविंदा व अमिताभ बच्चन यांना आला. त्यामुळे त्यांनी
पुन्हा राजकारणाची पायरी चढली नाही. आपली नेतेगिरी पडद्यावरच बरी आहे, असा त्यांना अनुभव आला आहे.
- रजा मुराद, ज्येष्ठ अभिनेते

सोलापूरः कायदा आणि संविधानाला विरोध करणारे शिक्षेस पात्र आहेत. स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी देशात अशांतता निर्माण करणारे गद्दार आहेत. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे, असे ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी सांगितले. देशातील सद्यस्थिती 1947 पेक्षाही वाईट आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

सोलापुरात आयोजिलेल्या एका खासगी कार्यक्रमासाठी श्री. मुराद सोलापुरात आले होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या. नंतर वातावरण शांत झाले. आपण सर्वजण मिळून मिसळून राहण्यास शिकलो. मात्र अाज परिस्थिती बदलली आहे. लोकांमध्ये अंतर पडू लागले आहे. त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. काळ पुढे जाईल तसे नफरत कमी होईल असे वाटत होते, मात्र उलट हा प्रकार वाढला आहे. काही स्वार्थी लोक त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी देशात अशांतता निर्माण करीत आहेत. इंटरनेट पहा, यु ट्युब पहा त्यावर इतके विष ओकले असते की ते सांगणे कठीण आहे. त्याचा शेवट कधी होणार. आपण कुठे चाललो आहोत. काय होणार आपल्या देशाचे. आमचे काय आता झाले. पुढच्या पिढीचे काय होणार याची चिंता आहे.

देशामध्ये जो ही नफरत पसरवण्याची गोष्टी करतो, संविधानाच्या विरोधात, कायद्याच्या विरोधात आहे, ते शिक्षेस पात्र आहेत. आपले मत मांडण्याचा सर्वांना हक्क आहे. पण कायदा व संविधानाच्या बाहेर जाऊन जाती-धर्माच्या नावावर दंगे भडकाविण्याचे काम कोणी करत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. तो कोणत्या जाती-धर्माचा आहे, हे महत्त्वाचे नाही. अशा घटना घडविणारे देशाचे खरे गद्दार आहेत. कारण त्यांनी देशातील शांती नष्ट केलेली असते. अशा घटकांबाबत शासनाने कडक धोरण अवलंबून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असेही श्री. मुराद म्हणाले.

Web Title: Action to be taken against domestic traitors: Raza Murad