कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई

प्रविण जाधव 
गुरुवार, 4 मे 2017

सातारा- जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सर्व त्या उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत. त्याबाबत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे. रुग्णांच्या सुविधेला प्राधान्य असल्याने कामचुकारपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशा इशारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिला.

सातारा- जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सर्व त्या उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत. त्याबाबत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे. रुग्णांच्या सुविधेला प्राधान्य असल्याने कामचुकारपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशा इशारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिला.

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती, रखडलेल्या शस्त्रक्रिया, औषधांची कमतरता व अस्वच्छता या सर्वांतील ढिसाळ कारभाराबाबत ‘सकाळ’ने वृत्त मालिका प्रसिद्ध केली. त्याची दखल घेत विविध उपाययोजना राबविण्यास सुरवात केली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. डॉ. भोई म्हणाले, ‘‘वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, उपलब्ध मनुष्यबळात रुग्णांना चांगली सेवा देण्याचे प्रयत्न आहेत. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागाच्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रुग्णांवर आवश्‍यकत्या शस्त्रक्रिया वेळेत करण्याबाबतही सांगितले आहे. त्याचबरोबर गंभीर रुग्णांनाच दुसऱ्या शासकीय रुग्णालयात पाठवावे, असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे. एमडी मेडिसीनचे पद तातडीने भरण्याची विनंती शासनाकडे केली आहे.

मागील वर्षी वरिष्ठ कार्यालयाकडून औषध पुरवठा कमी झाला. त्याचबरोबर जानेवारी २०१७ पासून औषधे खरेदी प्रक्रिया शासनाने थांबविली होती. स्थानिक पातळीवर खरेदीलाही बंधने आली आहेत. त्यामुळे रुग्णांना औषधांची कमतरता होती. मात्र, स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करून कमतरता होऊ देणार नाही, असेही डॉ. भोई म्हणाले.

जिल्ह्या रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी ६० कंत्राटी कर्मचारी होते. सध्या केवळ ३४ कर्मचारी घेण्याचा शासनाचा नियम आहे. दरम्यानच्या काळात कायमस्वरूपी कामावर असलेले दहा कर्मचारी निवृत्त झाले. त्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. निधीचीही कमतरता आहे. कर्मचारी संख्या वाढविण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे, असेही ते म्हणाले.

रुग्णांना योग्य पद्धतीने सेवा देण्याची जबाबदारी जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक घटकावर आहे. त्याबाबत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेकदा सूचना केल्या आहेत. यापुढे नियमानुसार काम न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

- डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा 

Web Title: Action on cheating workers