धाडसी कारवाईने वाळू तस्करीला "दणका'

Action on Illegal Sand Excavation Special Report
Action on Illegal Sand Excavation Special Report

जयसिंगपूर ( कोल्हापूर ) - शिरोळच्या तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी धाडसी कारवाई करत वाळू तस्करांना दणका दिला. हरीत लवादाच्या आदेशानंतर यांत्रिक बोटीने वाळू उपशावर बंदी घातल्यानंतर टंचाईमुळे सध्या वाळूला सोन्याचा भाव मिळू लागला आहे. अशा स्थितीत चोरीच्या वाळूतून संधीचे सोने करणाऱ्या वाळू तस्करांचा प्रयत्न तहसिलदारांनी हाणून पाडला. विशेष म्हणजे तस्करीमध्ये अगदी बारा-पंधरा वर्षाच्या मुलांचाही वापर होत असल्याचे कारवाईतून उघडकीस आले आहे. हि बाब चिंतेची असून आता वाळू साठेबाजांकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. 

21 एप्रिल 2017 रोजी हरीत लवादाच्या आदेशानुसार शासनाने यांत्रिक बोटीने वाळू उपशाला बंदी घातली. खास करुन कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी लक्षात घेतली तर नद्यांना बारमाही पाणी असते. पाण्याच्या प्रवाहामुळे यांत्रिक बोटीशिवाय वाळू काढणे शक्‍य नसल्याने गेल्या पावणेतीन वर्षापासून वाळू उपसा पूर्णपणे ठप्प आहे. परिणामी कर्नाटक आणि सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाळू आयात केली जात आहे. वाळूची टंचाई निर्माण झाल्याने आज वाळूला ब्रासमागे दहा ते बारा हजार रुपये मोजावे लागत आहेत. याचाच फायदा घेत वाळू तस्करांनी रात्रीच्या सुमारास पात्रातून बेकायदेशिर वाळू उपशाचा सपाटा लावला आहे. 

धाडसी कारवाईमुळे त्यांचे धाबे दणाणले

शिरोळ तहसिलदारपदाची नव्याने सुत्रे हाती घेतलेल्या सौ. मोरे-धुमाळ यांनी बेकायदेशिर वाळू उपशाची माहिती घेऊन शनिवारी रात्री स्वत: धाडसी कारवाई केली. औरवाडमधील या कारवाईने वाळू तस्करीचे स्वरुप पुढे आले आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक वाळूचे प्रमाण याच तालुक्‍यात आहे. आजवर मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करण्यात आला आहे. दरवर्षी यातून कोट्यवधीचा महसूलही शासनाला मिळाला आहे. सध्या बंदीमुळे बांधकामांवरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे चोरट्या वाळूतून पैसा मिळविणारी यंत्रणा तालुक्‍यातील कार्यन्वित झाली होती. मात्र, तहसिलदारांच्या धाडसी कारवाईमुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत. 

40 कोटीच्या महसूलावर पाणी 

2017 पासून हरित लवादाच्या आदेशानंतर यांत्रिकी बोटीने वाळू उपशाला बंदी आली. जिल्ह्यात वाळूतून सर्वाधिक महसूल शासनाला शिरोळ तालुक्‍यातून मिळत होता. मात्र, बंदीनंतर वाळू लिलावातून सुमारे 40 कोटीचा महसूल बुडाला आहे. 

घसरली पायाखालची वाळू 

शिरोळच्या तहसिलदार सौ. अपर्णा मोरे-धुमाळ यांच्या धाडसी कारवाईने वाळू तस्करांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. तत्कालीन तहसिलदार आणि सध्या गारगोटीचे प्रांताधिकारी संपत खिलारे यांनीही यांत्रिक बोटी पाण्यात बुडवून धाडसी कारवाई केली होती. यानंतर सौ. मोरे यांनी वाळू तस्करांवर अंकुश राहिल अशी कारवाई केली आहे. 

यापुढेही बेकायदेशिर वाळू उपशावर लक्ष

बेकायदेशिर वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसिलदार संजय काटकर, अव्वल कारकून (टेनन्सी) अनिल पाटील, धरणगुत्तीचे तलाठी गौरस कनवाडकर, जयसिंगपूरचे तलाठी अमोल माने व दत्तवाडचे मंडल अधिकारी विनायक माने यांच्या पथकाव्दारे औरवाडमधील कारवाई केली आहे. यापुढेही बेकायदेशिर वाळू उपशावर लक्ष राहिल. 

- सौ. अपर्णा मोरे-धुमाळ (तहसिलदार शिरोळ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com