स्थानिक पोलिसांना मटका दिसत नाही?

सुधाकर काशीद
बुधवार, 10 एप्रिल 2019

कारवाईनंतर आज शहरातील मटका अड्डे बंद राहिले; पण अंदाज घेऊन पुन्हा एकदोन दिवसांत ते सुरू होतील, असा आजवरचा अंदाज आहे. कोल्हापुरातला मटका लपूनछपून अजिबात नाही. मुख्य रस्त्यावर मटका घेतला जातो. या मटकेवाल्यांनी आपसांत ईर्ष्या, वैर नको म्हणून कोल्हापूर शहर ग्रामीण भागाची हद्द वाटून घेतली आहे. 

कोल्हापूर - कोल्हापुरात चालू असलेला मटका बाहेरून आलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांना दिसतो, मग तो मूळ कोल्हापुरातल्या पोलिसांना का दिसत नाही, अशी उघड आणि संतापाचा सूर असलेली प्रतिक्रिया कोल्हापुरात उमटली आहे. काल रात्री त्यांनी यादवनगरात केलेल्या कारवाईचे शहरवासीयांत स्वागत होत आहे; पण हे धाडस स्थानिक पोलिसांनी का केले नाही, अशीच चर्चा सर्वत्र आहे.

कालच्या कारवाईनंतर आज शहरातील मटका अड्डे बंद राहिले; पण अंदाज घेऊन पुन्हा एकदोन दिवसांत ते सुरू होतील, असा आजवरचा अंदाज आहे. कोल्हापुरातला मटका लपूनछपून अजिबात नाही. मुख्य रस्त्यावर मटका घेतला जातो. या मटकेवाल्यांनी आपसांत ईर्ष्या, वैर नको म्हणून कोल्हापूर शहर ग्रामीण भागाची हद्द वाटून घेतली आहे. लक्ष्मीपुरीच्या हद्दीत मालक सम्राट व एस. के. मामाशी संबंधित आहेत. राजवाड्यात सुहास, विजय, शाहूपुरीत आयुब व मेहबुब, राजारामपुरीत बबन सलिम, करवीरला जय, सुर्वे व भोगावतीला शीतल, पन्हाळ्याला सागर, वडगावला विश्रांत हे मटक्‍यांची सूत्रे सांभाळतात, पोलिसांनी यापूर्वी कारवाई केली आहे; पण पोलिसांची भीतीच वाटत नाही,  ‘तू मारल्यासारखे करायचे व मी रडल्यासारखे करायचे’ अशी कारवाई आहे. 

पोलिसांना मटकेवाले का घाबरत नाहीत? कारवाई करायला आलेल्या ऐश्‍वर्या शर्मा या अधिकाऱ्यावर हल्ला करायचे धाडस मटकेवाल्यात का आले, याचे कारण जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी शोधण्याची गरज आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोठे खुट्ट झाले, की ते पहिल्यांदा त्या ठाण्याच्या डीबीला, एलसीबीला कळते; मग उघड उघड सुरू असलेला मटका का दिसत नाही? या प्रश्‍नातच त्याचे उत्तर आहे. त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्याची डी.बी. ब्रॅण्च बदलण्याची गरज आहे. कारण त्या पोलिसांचा काणाडोळा हेच मटकेवाल्यांचे बळ आहे. म्हटले तर पोलिस एका तासात जिल्हा मटका बंद करू शकतात, अशी त्यांची ताकद आहे; पण ही ताकदच मटकेवाल्यांनी पोखरली असेल, तर मटका पुन्हा पाचसहा दिवसांनी सुरू झाला, तर ते आश्‍चर्य नसणार आहे. 

राजकीय, पांढरपेशांचे बळ 
मटकेवाले आणि गावठी दारूवाले, जुगारवाले, खासगी सावकार असे व्यवसाय करणारे काहीजण यापूर्वी महापालिकेत पदाधिकारी झाल्याचा इतिहास आहे. त्यांना राजकीय बळ आहे. काही पांढरपेशा नेत्यांचे ते जवळचे कार्यकर्ते आहेत.

Web Title: action on Matka crime report