जल्लोष केला नि वातावरण फिरले तर..?'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

राजकीय अनिश्‍चिततेच्या वातावरणामुळे तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते अजूनही "वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. त्यांच्याशी चर्चा केली असता, "शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते. शपथविधी आणि सरकार स्थापनेनंतरच जल्लोष करू,' असा सावध पवित्रा त्यांनी घेत, "जल्लोष केला आणि वातावरण फिरले तर हशा होतो,' असे ते खासगीत सांगू लागले आहेत...! 

नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्याबद्दल या तिन्ही पक्षांनी राज्यात ठिकठिकाणी जल्लोष केला असला, तरी नगर शहरात मात्र या तिन्ही पक्षांचे जणू अस्तित्वच नाही, अशी स्थिती आज होती.

राजकीय अनिश्‍चिततेच्या वातावरणामुळे तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते अजूनही "वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. त्यांच्याशी चर्चा केली असता, "शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते. शपथविधी आणि सरकार स्थापनेनंतरच जल्लोष करू,' असा सावध पवित्रा त्यांनी घेत, "जल्लोष केला आणि वातावरण फिरले तर हशा होतो,' असे ते खासगीत सांगू लागले आहेत...! 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून गेल्या महिनाभरापासून सत्तास्थापनेचा पेच कायम होता. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर महाविकास आघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असतानाच भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन राज्यात राजकीय भूकंप घडविला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभेत उद्या (बुधवारी) विश्‍वासदर्शक प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी फडणवीस-पवार सरकारवर आली होती. 

हेही वाचा आता पाणी पिण्यासाठीही मुलांना सुटी!

आज दुपारी आधी अजित पवार यांनी आणि नंतर फडणवीस यांनी राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या दाव्यानुसार त्यांच्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मुंबईत या सर्व घडामोडी घडत असताना महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जल्लोष सुरू केला. मात्र, नगरमध्ये असा कोणताही जल्लोष सायंकाळी उशिरापर्यंत दिसून आला नाही. कोणत्याही पक्षाच्या कार्यालयासमोर ना फटाके वाजले, ना कोणी पेढे-लाडू वाटल्याचे दिसले. 

हेही वाचा लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले ज्ञानेश्वर मंदिर 

जल्लोषाची तयारी; मात्र... 

राष्ट्रपती राजवट लागू होण्याआधी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे व पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे सत्तास्थापनेबाबत राज्यपालांना भेटण्यास गेले होते. त्या वेळी महाविकास आघाडीचे सरकार लगेच स्थापन होणार असे वाटल्याने शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली होती. मात्र, त्या वेळी कॉंग्रेसने समर्थनाचे पत्र वेळेत न दिल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा दुसऱ्या दिवशी अधिकृतपणे होणार, तोच मात्र रातोरात भाजपने अजित पवार यांच्यासह एकत्र येत पहाटे सरकार स्थापन केल्याने हिरमोडाचा दुसरा धक्का शिवसेना कार्यकर्त्यांना सहन करावा लागला.

पक्षांच्या कार्यालयांसमोर शुकशुकाट

या अतिवेगवान घडामोडी आणि अनिश्‍चित वातावरणामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आजही सावध भूमिका घेतली. तिन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर आज सायंकाळी शुकशुकाट होता. कार्यकर्ते सोशल मीडियावरूनच एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवत होते. रस्त्यावर उतरून जल्लोष किंवा आनंदोत्सव साजरा करण्यास कार्यकर्तेही तयार नसल्याचा अजब प्रकार आज प्रथमच समोर आला. 
 

यांनी मात्र जल्लोष केला... 

शरद पवार विचार मंचातर्फे मात्र माळीवाडा बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवून फटाक्‍यांची आतषबाजीही करण्यात आली. या वेळी अल्ताफ सय्यद, बबन बारस्कर, सय्यद नदीम, अजीज बडे, भैया पठाण, अभय पतंगे, शफी बागवान, आयान सय्यद, जिशान सय्यद, हजिक सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Activists in doubt Whether to cheer or not