प्रभाकर देशमुखांसाठी कार्यकर्ते आग्रही ;लोधवड्यात राष्ट्रवादीची बैठक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

माण मतदारसंघातून वाईट प्रवृत्तींना हद्दपार करणे, ही माझी प्राथमिकता आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखून योग्य निर्णय घेण्यात येईल. 
- प्रभाकर देशमुख, नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस. 

दहिवडी : "आमचं ठरलंय'मधून उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रभाकर देशमुख यांच्या निवासस्थानी ठिय्या दिला. काहीही झाले तरी तुम्हाला निवडणूक लढवावीच लागेल, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. सर्वांच्या मतांचा सन्मान करून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही श्री. देशमुख यांनी दिली. 

माण विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय "आमचं ठरलंय' आघाडीतर्फे अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर झाली. या निर्णयाचे वेगवेगळे पडसाद माण-खटाव तालुक्‍यांत उमटले. राष्ट्रवादी व विशेषतः प्रभाकर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांमधून या निर्णयाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. कार्यकर्त्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट टाकून श्री. देशमुख यांच्या निवासस्थानी जमण्याचे आवाहन केले. त्यानुसार आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी लोधवडे येथे जमण्यास सुरवात केली होती. साडेअकरा वाजता बैठकीस सुरवात झाली. त्यात कार्यकर्त्यांनी अत्यंत पोटतिडकीने व संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जो निर्णय झाला, तो आम्हाला मान्य नसून प्रभाकर देशमुख यांनीच उमेदवारी केली पाहिजे, आम्ही कोणाचेही काहीही ऐकणार नाही, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत होते.

महाआघाडीत ही जागा स्वाभिमानी पक्षाला देण्याचे सूतोवाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. पण, मतदारसंघातील अपप्रवृत्ती घालविण्यासाठी लोकभावना ओळखून विजयी होणाऱ्या उमेदवारासाठी "स्वाभिमानी' आपला हक्क सोडण्यास तयार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार यांनी सांगितले. खटावमधील राष्ट्रवादीचा गट प्रभाकर देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून त्यांनी माण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे आवाहन माजी सभापती संदीप मांडवे यांनी केले. 

बैठकीला माणचे सभापती रमेश पाटोळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, पंचायत समिती सदस्य तानाजी कट्टे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे, युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब मदने, राजूभाई मुलाणी, पृथ्वीराज गोडसे, सतीश मडके, किशोर सोनवणे, रमेश शिंदे, बाळासाहेब कदम, डॉ. संतोष देशमुख, धनाजी काळे, सूर्याजीराव जगदाळे, सुनील सूर्यवंशी, अभय जगताप, "राष्ट्रवादी युवक'चे माण विधानसभा अध्यक्ष प्रशांत वीरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांच्या भावना श्री. देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांनी ऐकून घेतल्या. कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल आभार मानून त्यांनी सर्वांच्या विचाराने लवकरच योग्य निर्णय घेऊन सगळ्यांना सांगण्यात येईल, असे जाहीर केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Activists insist for Prabhakar Deshmukh