ग्रामीण भागातील नवखा कलाकार काळाच्या पडद्याआड

नानासाहेब पठाडे
मंगळवार, 11 जून 2019

पोथरे तालुका करमाळा येथील सर्वसामान्य परिवारातील दत्ता शिंदे यांनी स्वनिर्मीत महाराष्ट्राची लोकधारा ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा अॉर्केस्ट्रा चांगलाच गाजला होता. त्यांनी ‘मामा बिलंदर’ या प्रसिद्ध चित्रपटात अभिनेते अशोक गोडगे यांच्यासह सहअभिनेता म्हणून विनोदी भूमिकेत दमदार काम केले होते. याचबरोबर ‘बहुरूपी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

पोथरे (सोलापूर) : कलाकाराची कुठलीही पार्श्वभूमी नसताना गरीब कुटुंबात असूनही अभिनेता होण्याचे देह समोर ठेवून स्वकर्तुत्वाने जिद्दीने अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा हरहुन्नरी कलाकार दत्ता सेवा शिंदे किडनीच्या आजाराने काळाच्या पडद्याआड गेला. गायन कलेपासून आपल्या कलेची सुरुवात करून पुढे निवेदक, कथा लेखक, कवी, नाटककार, अभिनेता व दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारा दत्ता शिंदे हा शेवटच्या क्षणापर्यंत कलाकार म्हणूनच जीवन जगला. 

पोथरे तालुका करमाळा येथील सर्वसामान्य परिवारातील दत्ता शिंदे यांनी स्वनिर्मीत महाराष्ट्राची लोकधारा ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा ऑर्केस्ट्रा चांगलाच गाजला होता. त्यांनी ‘मामा बिलंदर’ या प्रसिद्ध चित्रपटात अभिनेते अशोक गोडगे यांच्यासह सहअभिनेता म्हणून विनोदी भूमिकेत दमदार काम केले होते. याचबरोबर ‘बहुरूपी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दुष्काळी स्थितीवर सरकारी पॅकेज जाहीर होते पण खरंच शेतकरी सुधारतो का.?  लघुपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात त्यांनी सर्व अशिक्षित, दुष्काळी भागातील नव कलाकारांना अभिनयाची संधी दिली होती. या सह शिंदे यांनी भक्तीची सत्त्वपरीक्षा, चल ‘लव’कर, काळी आई या चित्रपटाबरोबर “अवचित” या दूरदर्शनवरील मालिकेत ही कलाकार म्हणून काम केले. त्यांनी “कमलाईची नजर काढा गं” ही करमाळा नगरीचे कुलदैवत आई कमलाभवानी देवीच्या गीतांच्या अल्बम सिडीची ही निर्मिती केली होती.

सध्या ‘शेरास सव्वाशेर’ ‘सायलेन्स शूटिंग चालू आहे’ या नाटकांमध्ये ही दत्ता शिंदे यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. गेली तीन वर्षापासून त्यांच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर व त्यानंतर पुणे येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.दरम्यानच्या काळात त्यांच्या परिवाराला मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.त्यावेळी समाजातील दानशुरांनी केलेल्या सहकार्यामुळे उपचारास मदत मिळत होती. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. पोथरे येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात भाऊ पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. त्याच्या या अकाली जाण्यामुळे तालुक्याच्या कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor Datta Shinde passed away