कोल्हापूर, सांगलीतील नेमकी परिस्थिती काय? इथे वाचा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या महापुराने कोल्हापूर आणि सांगली ही दक्षिण महाराष्ट्रातील दोन्ही शहरे अभूतपूर्व संकटात आहेत. कोल्हापुरात नौदल आणि सागरी सीमा सुरक्षा दलाचे बचाव पथक दाखल झाले आहे.

कोल्हापूर : कृष्णा खोऱयात महापुराचे थैमान सुरू आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या महापुराने कोल्हापूर आणि सांगली ही दक्षिण महाराष्ट्रातील दोन्ही शहरे अभूतपूर्व संकटात आहेत. कोल्हापुरात नौदल आणि सागरी सीमा सुरक्षा दलाचे बचाव पथक दाखल झाले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, दोन्ही जिल्ह्यांतील 65 हजार पूरग्रस्तांचे स्थलांतर केल्याची माहिती असली, तरी प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी पटीने जास्त असण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे बंद झाले असल्याची माहिती मिळते आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातूनही विसर्ग सुरू असल्याने पूरस्थिती ओसरायला लागेल, अशी शक्यता आहे. मात्र, या सर्व शक्यता आहेत. सध्याची परिस्थिती अनिश्चित आहे. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दुपारी दोन वाजता कोल्हापुरात दाखल होत आहेत. प्रशासनाला सहकार्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, कोस्टल फोर्स कोल्हापुरात आल्या आहेत. बोटी वाढवतो आहोत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणे झाले असून ते आर्मीच्या काही बोटी पाठवत आहेत. सहकार्य करा, घाबरून जाऊ नका, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. 

कोयना, वारणा, अलमट्टी धरण प्रशासनाशी समन्वय
सांगली जिल्ह्यामध्ये मिरज, पलूस, वाळवा व शिराळा या तालुक्यांतील नदीकाठची एकूण 107 गावे पूरप्रवण असून, धरणातून होणाऱ्या विसर्गाच्या पार्श्वभूमिवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरण - पाटबंधारे विभाग, वारणा धरण - पाटबंधारे विभाग, अलमट्टी धरण - प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी बेळगाव, विजापूर, अलमट्टी प्रशासन यांना अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 518 मीटर ते 518.50 मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याबाबत महाराष्ट्राने विनंती केली आहे.      

कोल्हापूर आणि सांगली जिल्हा माहिती खात्याकडून व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून ताजी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची उंची 54.4 फुट आहे. कोयनेतून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. दरवाजे 16 फुटांवरून 14 फुटांपर्यंत खाली आणले आहेत. 

अफवा पसरवू नयेत
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने केले आहे. कोयनेबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन साताऱयाच्या पोलीस प्रशासनाने केले आहे. 

रमण मळा - न्यू पॅलेस परिसरातील नागरिकांना बोटीतून अन्यत्र नेण्यात आले.

हातकणंगले, शिरोळला मोठा फटका
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचा मोठा फटका हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात बसला आहे या दोन्ही तालुक्यातील तब्बल 38 हजार नागरिक स्थलांतरित झाले असून सुमारे 14 हजार जनावरे ही अन्यत्र हलविण्यात आले आहेत. शिरोळ तालुक्यातील तीस गावांना तर हात करून तालुक्यातील 17 गावांना पुराचा प्रचंड तडाखा बसला आहे. शिरोळ तालुक्यातील एकूण 33 मार्ग बंद झाले असून सन 2005 पेक्षा अधिक पुराचा फटका या भागाला सध्या बसला आहे. या ठिकाणी एनडीआरएफचे जवान दाखल झाले असून आर्मी आणि नेव्हीचे पथक आज या ठिकाणी दाखल होत आहेत शिरोळ तालुक्यातील 16 गावे पूर्णपणे पाण्याने वेढले असून त्या ठिकाणच्या नागरिकांना आता हवाई दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात येणार आहे. तालुक्यातील प्रसिद्ध श्री दत्त देवस्थान असलेले नरसिंह वाडी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. हातकणंगले तालुक्यातील पंधरा हजार नागरिक स्थलांतरित झाले असून सुमारे 13 मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. याचबरोबर या भागातील राज्य मार्ग आणि रेल्वे मार्गही पाण्याखाली गेले आहेत. पुराचा यावर्षी इचलकरंजी शहराला ही मोठा फटका बसला असून तब्बल 700 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर आतापर्यंत झाले आहे.

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), टेरिटोरियल आर्मी, कोल्हापूर, पुणे-चिंचवड महानगरपालिका पथक अशा पथकांना पाचारण करण्यात आले असून, यामध्ये 211 जवानांचा समावेश आहे. ही पथके इस्लामपूर - वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यात बचाव कार्य करत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 10 हजार 282 कुटुंबांतील 53 हजार 228 लोक व 16 हजार 633 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी येथे दिली.

kolhapur

सरासरी 481.8 मिमी. पाऊस
कोयना, वारणा या धरण क्षेत्रात 3 ऑगस्टनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 1 जूनपासून 7 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजेपर्यंत अखेर सरासरी 481.8 मि. मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस शिराळा (1429.2 मि. मी.), वाळवा (582.6 मि. मी.) आणि सर्वात कमी पाऊस आटपाडी (177.8 मि. मी.), जत (169.5 मि. मी.) या तालुक्यांमध्ये झाला आहे. 

कोयना, वारणा धरणातून विसर्ग
कोयना धरणाची क्षमता 105.24 टी. एम. सी. असून पाणीसाठा 102.21 टी. एम. सी. (97 टक्के) आहे. तर दि. 6 ऑगस्टपर्यंत 1 लाख 22 हजार 475 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. वारणा धरणाची क्षमता 34.40 टी. एम. सी. असून पाणीसाठा 32.26 टी. एम. सी. (93.77 टक्के) आहे. तर दि. 6 ऑगस्टपर्यंत 30 हजार 114 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आलमट्टी धरणाची क्षमता 123 टी. एम. सी. असून पाणीसाठा 92.85 टी. एम. सी. (75 टक्के) आहे. तर दि. 6 ऑगस्टपर्यंत 4 लाख 24 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 

kolahpur

सांगलीत कृष्णा इशारा पातळीच्या 14 फुटावर
सांगलीच्या आयर्विन पुलाची इशारा पातळी 40 फूट तर धोका पातळी 45 फूट आहे. दि. 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत 54.4 फूट होती. या पार्श्वभूमिवर आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 10 हजार 282 कुटुंबांतील 53 हजार 228 लोक व 16 हजार 633 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील 907 कुटुंबांतील 7 हजार 752 लोक व 443 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन केले आहे. पाणीपातळी  2 फूट वाढल्यास आणखी 5 हजार 293 कुटुंबांतील 25 हजार 206 व्यक्ती व 1 हजार 844 जनावरांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करावे लागेल. 

पाण्याखाली गेलेले रस्ते व रेल्वेमार्ग
सांगली जिल्ह्यातील 22 राज्य मार्ग, 29 प्रमुख जिल्हा मार्ग, 1 इतर जिल्हा मार्ग व 1 ग्रामीण रस्ता पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर ते मुंबई रेल्वे मार्ग बंद आहे. तर एस. टी. महामंडळाकडील 20 मार्ग बंद आहेत. 

Kolhapur

आपत्कालिन परिस्थितीतील संपर्क क्रमांक
कोल्हापूर जिल्हा स्तर नियंत्रण कक्ष: 
02312659232
02312652950
02312652953
02312652953
किंवा टोल फ्री क्रमांक : 1077
पोलीस नियंत्रण कक्ष : 02312666233 
वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष : 02312641344
पाटबंधारे नियंत्रण कक्ष : 02312654735/36
कोल्हापूर महानगरपालिका कक्ष : टोल फ्री क्रमांक 101
महावितरण : 7875769103

कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे पूरग्रस्तांसाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था, जिल्हा न्यायालय, कसबा बावडा रोड, न्यायालय इमारतीमध्ये करण्यात आली आहे. संपर्क क्रमांकः 02312541295, 9860074233, 9404311970

सांगली जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षः 09370333932


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actual flood condition at Kolhapur and Sangli