पानसरे खटल्यात ऍड. राणे सरकारी वकील नाहीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून शिवाजीराव राणे यांची नियुक्तीच नसल्याचा आक्षेप आरोपी समीर गायकवाड याच्या वकिलांनी आज न्यायालयात घेतला. या वेळी ऍड. राणे यांनी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेले नियुक्तिपत्र यापूर्वीच सादर केल्याचा खुलासा केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी 16 मार्चला होईल. सुनावणी वेळी पानसरे हत्येतील पहिला आरोपी, सनातनचा साधक समीर गायकवाड न्यायालयात हजर होता.

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर आरोपी गायकवाड याच्यासह डॉ. वीरेंद्र तावडे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. ज्या वेळी तावडेला अटक केली तेव्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सरकारी पक्षातर्फे ऍड. शिवाजीराव राणे यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर तावडेला 9 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर सनातनच्या एका मुंबईतील साधकाने ऍड. राणे यांची नियुक्ती कशी केली आहे, याबाबतचा माहिती अधिकारातील अर्ज पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयात दिला होता. तो अद्याप प्रलंबित आहे. त्यानंतरही आज आरोपी गायकवाड याचे वकील पटवर्धन यांनी न्यायालयात सुनावणी सुरू होताच ऍड. राणे हे गोविंद पानसरे हत्येच्या खटल्यात विशेष सरकारी वकील नाहीत, असा गौप्यस्फोट करीत त्याबाबतचा अर्ज न्यायाधीशांकडे सादर केला.

Web Title: ad. rane saheb not government lawyer in pansare case