'शेतकऱ्यांचा अंत न पहाता ऊस दर जाहीर करा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

हंगामही जेमतेम तीन महिने चालेल असा अंदाज आहे. त्यामुळे कमी साखर उत्पादनामुळे साखरेची टंचाई निर्माण होणे साहजिक आहे. अशा परिस्थितीत ऊस उत्पादक शेतक-यांना त्याचा फायदाही झाला पाहिजे.  

विटा ( सांगली ) - साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सुरवात होऊ लागली आहे. परंतु एकही कारखानदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उसाच्या दरासंबंधी काहीच बोलायला तयार नाही. प्रत्येक वर्षी उसाच्या दराचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यामध्ये संघर्ष होत आहे. सरकार या संघर्षामध्ये भूमिका घेत नाही. चालुवर्षी अगोदरच महापुर आणि अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा अवस्थेत कारखानदारांनीही शेतकऱ्यांचा अंत न पहाता ऊस दर जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे मत खानापूर - कडेगांव शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस सुभाष पाटील यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा -  शेतकऱ्यांनो, संयम पाळा; राजू शेट्टींनी का केले असे आवाहन ? 

अॅड. पाटील म्हणाले, अगोदरच पावसामुळे लांबलेला हंगाम आता सुरु होऊ लागला आहे. सर्वच कारखानदारांनी गव्हानीत मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ मोठ्या धुमधडाक्यात सुरु करण्याचा धडाका लावला आहे. चालुवर्षी उसाची उपलब्धता अत्यंत कमी आहे. हंगामही जेमतेम तीन महिने चालेल असा अंदाज आहे. त्यामुळे कमी साखर उत्पादनामुळे साखरेची टंचाई निर्माण होणे साहजिक आहे. अशा परिस्थितीत ऊस उत्पादक शेतक-यांना त्याचा फायदाही झाला पाहिजे.  

हेही वाचा -  अबब !  भाकरी महागली; शाळू दरात इतकी वाढ 

संघटनाना संघर्षाशिवाय पर्याय नाही

ते म्हणाले, दरवर्षी ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत येतो आहे. त्याला संघर्ष करावा लागत आहे. आणि आम्हीही शेतकरीच आहोत म्हणणारे साखर कारखानदार या बाबतीत सरकारकडे बोट दाखवून वेळ मारुन नेत आहेत. ही परिस्थिती बरोबर नाही. गेल्या हंगामात गाळप केलेल्या ऊसाचे पैसेही काही कारखानदारानी अजूनही शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्यांनी हे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत, यासाठी सरकारही त्यांचेवर ठोस उपाय करायला तयार नाही. अशा अवस्थेत शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्या संघटनाना संघर्षाशिवाय पर्याय राहत नाही. तरी कारखानदारांनी आपले साखर कारखाने सुरु करताना ऊस दराचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा संघर्ष अटळ आहे, याची दखल कारखानदार आणि शासन, प्रशासनाने घ्यावी.

हेही वाचा - सांगलीत बेदाणा सौद्यात मिळाला इतका उच्चांकी दर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ad Subhash Patil Comment On Sugarcane Rate Issue