व्यसनी तरुणाने केला आईचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

- तांभेरे ता राहुरी येथे व्यसनी मुलाने आईला मारहाण करून खून केल्याची घटना काल (बुधवारी) मध्यरात्री घडली.

- अंत्यविधीच्या तयारीत असताना आज (गुरुवारी) सकाळी दहा वाजता घटनास्थळी जाऊन राहुरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

राहुरी : तांभेरे ता राहुरी येथे व्यसनी मुलाने आईला मारहाण करून खून केल्याची घटना काल (बुधवारी) मध्यरात्री घडली. अंत्यविधीच्या तयारीत असताना आज (गुरुवारी) सकाळी दहा वाजता घटनास्थळी जाऊन राहुरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

इंदुबाई लांडे (वय ७०, रा. तांभेरे) असे मृताचे नाव आहे. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले की, "व्यसनाच्या आहारी गेलेला मुलगा राजेंद्र लांडे (वय ४५, रा. तांभेरे) याने नशेमध्ये काल (बुधवारी) मध्यरात्री स्वतःच्या आईला चुलीच्या फुकणीने डोक्यात आणि पोटावर बेदम मारहाण केली. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने, आई इंदुबाई यांचा मृत्यू झाला. राजेंद्र याच्या व्यसनाधीनतेमुळे त्याची पत्नी घर सोडून निघून गेलेली आहे.

"आजारपणामुळे आईचा मृत्यू झाला आहे. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी यावे. असा निरोप राजेंद्र याने पाहुण्यांना दिला. परंतु, खून केल्याचे लक्षात आल्याने पाहुण्यांनी राहुरी पोलिस ठाण्याला संपर्क साधला. अंत्यसंस्काराची तयारी करत असताना आज (गुरुवारी) सकाळी दहा वाजता तांभेरे येथे घटनास्थळी जाऊन आरोपी राजेंद्र यास अटक केली आहे." असेही देशमुख यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: addicted teen murdered his mother