करा जल्लोष... पण, जरा जपूनच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

सातारा - सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सारे सज्ज झाले असून या निमित्त झडणाऱ्या पार्ट्या, निसर्गरम्य ठिकाणी होणारे जल्लोष यासाठी हॉटेल, धाब्यांसह अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. खवय्यांचे बेत पक्के झाले आहेत. तर, कुटुंबवत्सल नागरिकांचीही घरगुती जल्लोषाची तयारी उत्साहात सुरू आहे. या जल्लोषामध्ये अतिउत्साह दाखवणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसही सज्ज झाले आहेत. कारवायांसाठी विविध पथके तैनात करण्यात येणार आहेत.

सातारा - सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सारे सज्ज झाले असून या निमित्त झडणाऱ्या पार्ट्या, निसर्गरम्य ठिकाणी होणारे जल्लोष यासाठी हॉटेल, धाब्यांसह अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. खवय्यांचे बेत पक्के झाले आहेत. तर, कुटुंबवत्सल नागरिकांचीही घरगुती जल्लोषाची तयारी उत्साहात सुरू आहे. या जल्लोषामध्ये अतिउत्साह दाखवणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसही सज्ज झाले आहेत. कारवायांसाठी विविध पथके तैनात करण्यात येणार आहेत.

नवीन वर्षाच्या जल्लोषामध्ये प्रामुख्याने हॉटेलिंग व पार्ट्यांचे नियोजन ठरलेले असते. या शौकिनांना आकर्षित करण्यासाठी विविध हॉटेल्स, ढाब्यांना विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या पदार्थांचे आकर्षक मेनूही सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने ३१ डिसेंबर कुठे साजरा करायचा, हे निश्‍चित केले आहे.
 
गडकोटांचे सौंदर्य जपा...
नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये सर्वजणच सहभागी होत असतात. मात्र, काही अतिउत्साही लोकांमुळे इतरांना त्रास सहन करावा लागतो. ऐतिहासिक वारसा असलेल्या गडकोटांवर अस्वच्छता होते. त्यातून अनेकदा अपघात तसेच वादाचे प्रसंग उद्‌भवतात. परिणामी आनंदावर विरजण पडते. त्यामुळे जल्लोष करा, पण जरा जपून, दुसऱ्याला त्रास होणार नाही, याची काळजी घेत असे म्हणण्याची वेळ येते. त्याचसाठी उद्या पोलिस रस्त्यावर असणार आहेत. शहर पोलिसांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे. 

वाहनचालकांची तपासणी
दारू पिऊन वाहन चालविणारे, रस्त्यावर गोंधळ घालणारे, भरधाव वेगात गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चार पथके नेमण्यात आली आहेत. शहरातील प्रवेशाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ ॲनालायझरने तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अजिंक्‍यतारा व चारभिंती परिसरात दारू पिण्यासाठी बसणाऱ्यांना रोखण्यासाठी फिक्‍स पॉइंट नेमण्यात येणार आहेत.

हॉटेल्स व धाबे निर्धारित वेळेत बंद राहतील, याबाबतची काळजी घेतली जाणार आहे. शहर पोलिस व शहर ट्राफिक विभागाचे कर्मचारी एकत्रितपणे ही मोहीम राबविणार आहेत.

फटाक्‍यांना बंदी
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांकडून फटाक्‍यांची आतषबाजी केली जाते. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री दहानंतर फटाके फोडण्यास बंदी आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची तयारी शहर पोलिसांनी केली आहे. रात्री बारानंतर फटाके फोडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा कार्यरत असणार आहे. फटाके फोडताना सापडलेल्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

जल्लोष करा, पण...नियमात
नवीन वर्षाचे स्वागत सर्वजण आपापल्या पद्धतीने करत असतात. मात्र, या उत्साहत इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्या. दारू पिऊन गाडी चालवू नका. गडकोटांवर दारूच्या पार्ट्या करू नका. त्याचबरोबर त्यांना रोखणाऱ्यांनीही कायदा हातात न घेता जवळच्या पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.

मोठा बंदोबस्त
नववर्षाच्या स्वागतादरम्यान तसेच कोरेगाव भीमाच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिस दल सज्ज झाले आहे. ठिकठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांबरोबर एक राज्य राखीव दलाची तुकडी व सहाशे होमगार्डस त्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.

 

पर्यटनस्थळांवरही नजर
तालुका पोलिसांनीही पर्यटनस्थळी नववर्षाच्या स्वागताला येणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडू नये यासाठी खबरदारी घेतली आहे. कास रस्ता, उरमोडी धरण, वेण्णानगर, साबळेवाडी, महामार्ग या ठिकाणी गस्तीसाठी पथके तैनात करण्यात येणार आहेत. हुल्लबाजी करणाऱ्यांवर या पथकांकडून कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातही ठिकठिकाणी असलेल्या संभाव्य पार्ट्यांच्या ठिकाणी पोलिसांचे लक्ष असणार आहे. प्रमुख मार्गांवर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आपल्यामुळे इतरांच्या आनंदावर विरजण पडणार नाही, याची काळजी घेत जल्लोष करणे आवश्‍यक आहे, अन्यथा नवीन वर्षाची सुरवात पोलिस ठाण्यातून करावी लागू शकते.

Web Title: Addiction New Year Welcome