जादा दराने, ऐनवेळच्या ठरावात नेहमीच होते औषध खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

सांगली - महापालिकेच्या औषध खरेदीवरून स्थायी समितीच्या गेल्या काही बैठका गाजत आहेत. कॉंग्रेसचे सदस्य बसवेश्‍वर सातपुते यांनी काल सांगलीच्या बाजारपेठेत स्वतः दोन औषधे सुमारे अडीच-तीनपट कमी दराने खरेदी करून आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासमोर ठेवली. औषधे जादा दराने, गरज नसताना, बंदी असणारी खरेदी होतात, हाच इथला पायंडाच आहे. हा भ्रष्टाचार कोणीही रोखणार असेल तर त्याचे स्वागतच. यानिमित्ताने औषध खरेदीची पारदर्शक पद्धत निश्‍चित व्हावी.

सांगली - महापालिकेच्या औषध खरेदीवरून स्थायी समितीच्या गेल्या काही बैठका गाजत आहेत. कॉंग्रेसचे सदस्य बसवेश्‍वर सातपुते यांनी काल सांगलीच्या बाजारपेठेत स्वतः दोन औषधे सुमारे अडीच-तीनपट कमी दराने खरेदी करून आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासमोर ठेवली. औषधे जादा दराने, गरज नसताना, बंदी असणारी खरेदी होतात, हाच इथला पायंडाच आहे. हा भ्रष्टाचार कोणीही रोखणार असेल तर त्याचे स्वागतच. यानिमित्ताने औषध खरेदीची पारदर्शक पद्धत निश्‍चित व्हावी. माझ्या काळात पैची औषध खरेदी झाली नाही, असे बिनदिक्कत सांगणाऱ्या माजी सभापती संतोष पाटील यांना आपल्या काळात सुमारे एक कोटींच्या अशाच पद्धतीने झालेल्या औषध खरेदीचे पूर्णतः विस्मरण झाले. त्यातही एकदा त्यासाठी ऐनवेळचा ठराव करण्यात आला आहे. 

सध्या गाजत असलेली 1 कोटी 49 लाख रुपयांची 41 प्रकारची औषध खरेदीची निविदाप्रक्रिया संतोष पाटील यांच्या काळातच सुरू झाली. गेल्या वर्षी 6 जून 2016 चा हा ठराव. त्याआधी श्री. पाटील यांच्या काळात दोनवेळा औषध खरेदी झाली. 6 मे रोजी 353 प्रकारची 65 लाख 92 हजार रुपयांची खरेदी झाली. त्याआधी 9 डिसेंबर 2015 रोजीच्या सभेत ऐनवेळच्या विषयात 29 लाख 74 हजार रुपयांची औषध खरेदी झाली. त्यावेळी सात प्रकारची खरेदी झालेली औषधांचे दरांची सध्याच्या बाजारभावाशी तुलना केली असता तेव्हाही त्या औषधांचे दर जास्तच आहेत. आता त्या औषधांची एमआरपी (अधिकतम विक्रीमूल्य) किती, याची माहिती उपलब्ध झाली नाही. थोडक्‍यात आता स्थायीत विरोधक झालेले आधीचे सत्ताधारी कितीही नाकाने वांगी सोलत असले तरी याच मंडळींनी अशी औषध खरेदी करायचा शिरस्ता रुजवला आहे. महाआघाडी असो की कॉंग्रेसचा सत्ताकाळ, प्रत्येक खरेदीतला हिशेब पक्का आहे. हा हिशेब किती असावा याचा ताळतंत्र सुटला आहे. तब्बल तीन पटीने जादा औषध खरेदी करण्यापर्यंत प्रशासनाची मजल गेली आहे. प्रत्येक टप्प्यावर "हिशेब' पूर्ण करीत या औषधाची खरेदी होते. 

शेजारच्या कोल्हापूर महापालिकेला म्हणे वर्षाकाठी 35 लाखांची औषधे लागतात, अशी माहिती या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या श्री. सातपुते यांनी दिली. त्यांच्या तुलनेत क्षेत्रफळ जादा असल्याने इकडे जादा औषध फवारणी होत असते. त्यामुळे जादा औषधे लागतात. हा फरक किती असावा ? तीनपट अधिक? ही औषधे नेमकी कोठे जातात, या प्रश्‍नाच्या खोलात जाणे म्हणजे नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ शोधण्यासारखे आहे. वर्षानुवर्षे बिनबोभाट महापालिकेत अशी भ्रष्टाचाराची कुरणे तयार झाली आहेत. ती प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पोसली आहेत. ती बुजवण्यासाठी कोणी पश्‍चात बुद्धीने जरी प्रयत्न करीत असेल तरी त्याचे स्वागतच करायला हवे. प्रश्‍न उरतो तो भूमिकेतील सातत्याचा. दिलीप पाटील, संतोष पाटील, बसवेश्‍वर सातपुते या सदस्यांनी स्थायी समितीत घेतलेल्या विरोधकाच्या भूमिकेचे स्वागत करताना त्यांनी हा मुद्द तडीस न्यावा. करता आली तर आधीचीही जादा दराने झालेली वसुली करावी.

Web Title: Additional rate, always buy the drug at the eleventh hour of the resolution