'परिस्थितीनेच माझ्यात जिद्द निर्माण केली' 

अण्णा काळे
रविवार, 3 जून 2018

दिवसाचे सात-आठ तास नियमित अभ्यास करत होतो. माझ्यासाठी बहीण मंजिरीने नोकरी केली व घर चालवले. 11 वी क्‍लासची फी कशी तरी दिली ही परिस्थिती पाहुन माझ्या क्‍लासचे प्रा. सच्चिदानंद घोणसे, प्रा. कांडके व श्रीमती प्रा.पोळ यांनी 12 वीची फी घेतली नाही.

करमाळा : "माझे वडील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात नोकरीला आहेत. माझ्या अकरावी व बारावीच्या वर्षात त्यांचा एकही पगार झाला नाही. शिक्षण सुरू असताना घरातील आर्थिक चणचण सतत जाणवत होती. याच परिस्थितीने माझ्या मनात जिद्द निर्माण झाली. झपाटल्यासारखा अभ्यास केला. त्यामुळे मी राज्यात पहिला येऊ शकलो, आता जिल्हाधिकारी होण्याचे ठरवले आहे, असे अभियंत्रिकी सीईटी परीक्षेत राज्यात पहिला आलेल्या कोर्टी (ता. करमाळा) येथील आदित्य सुभाष अभंग याने आज "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

त्याला 200 पैकी 195 गुण मिळाले आहेत. नगर येथील न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये सध्या तो शिकत असून बारावीला त्याला 93 टक्के गुण मिळाले आहेत. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आदिनाथनगर (शेलगाव) येथे झाले. आदित्य अभंग म्हणाला, ""माझ्या शिक्षणसाठी नगरला माझ्याबरोबर माझी आई रंजना व बहीण मंजिरी राहील्या. घरात पैशाची अडचण आहे हे मला समजणार नाही याची आई काळजी घेत होती. पण मला हे सगळे समजत होते. वडील पगार नसताना नोकरी करतात. हे बदलण्यासाठी मी काहीतरी केले पाहिजे.

दिवसाचे सात-आठ तास नियमित अभ्यास करत होतो. माझ्यासाठी बहीण मंजिरीने नोकरी केली व घर चालवले. 11 वी क्‍लासची फी कशी तरी दिली ही परिस्थिती पाहुन माझ्या क्‍लासचे प्रा. सच्चिदानंद घोणसे, प्रा. कांडके व श्रीमती प्रा.पोळ यांनी 12 वीची फी घेतली नाही. माझे आजोबा कै.काशिनाथ अभंग यांनी कोर्टीत 50 वर्षापूर्वी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली होती, हाच वारसा घेऊन भविष्यात वाटचाल करणार आहे. आदिनाथ कारखान्याच्या पगारी थकल्याने आदित्यच्या शिक्षणसाठी पैसे उभे करण्याचे आव्हान होते. त्यासाठी फंडाचे पैसे काढले, अनेक पाहुण्यांनी मदत केली. मुलीने नोकरी केली. आदित्यने राज्यात सीईटीत पहीले येऊन सोसलेले सगळे कष्ट हलके केले.

Web Title: Aditya Abhang success story