"ऍडव्हान्स'च्या समायोजनासाठी 16 जुलै "डेडलाईन' 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 6 जुलै 2018

सोलापूर : विविध कार्यालयीन कामांसाठी घेतलेल्या "ऍडव्हान्स' रकमेचे 16 जुलैपर्यंत समायोजन करावे, असे परिपत्रक मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांनी जारी केले आहे. कोट्यवधीच्या "ऍडव्हान्स' रकमेचा ताळमेळ नसल्याबाबतचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर लेखापाल कार्यालयाने या संदर्भातील माहिती मागविण्यास सुरवात केली आहे. 

महापालिका व अंगीकृत विभाग मिळून 49 कार्यालये आहेत. त्यापैकी 25 ते 30 कार्यालयांनी आपल्या "ऍडव्हान्स' रकमा समायोजित केल्या आहेत. उर्वरित 19 कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी मात्र अद्याप उचललेल्या रकमेचा हिशेब दिलेला नाही. त्याची रक्कम जवळपास साडेसात ते आठ कोटींपर्यंत जाते. या रकमेचे समायोजन 16 जुलैपर्यंत करावे, अन्यथा मुख्य लेखापाल कार्यालयामार्फत रक्कम निश्‍चित केली जाईल व त्यानुसार समायोजन करावे लागेल, असे सूचित करण्यात आले आहे. 

खातेप्रमुखांनी सुयोग्य वेळेतच आपल्या गरजा ओळखून त्याप्रमाणे खरेदी प्रक्रिया राबवावी. अत्यंत निकडीच्या प्रसंगीच संबंधित खातेप्रमुखांनी सदरची गरज का आहे व कोणत्या खरेदीविषयक आहे, बांधकामविषयक आहे, याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्‍यक आहे. अशाप्रकरणी मुख्य लेखापरीक्षकांनी अहवाल दिल्यावरच अग्रिम दिले जाणार आहे, असेही या संदर्भात काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. 

ऍडव्हान्सचे समायोजन न होणे, ही आर्थिक बाबीशी निगडित असल्याने गंभीर बाब आहे. प्रलंबित अग्रिम रकमेची जमाखर्ची तत्काळ करण्याबाबत महालेखाकार व स्थानिक लेखापरीक्षणात आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे समायोजन वेळेत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 
- शिरीष धनवे, मुख्य लेखापाल 

Web Title: for adjustment 16 july is deadline