त्या' अनुदानासाठी सुरू झाले... मिशन प्रशासन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

प्रशासनातर्फे जिरायती, बागायती आणि फळबागा मिळून चार लाख 54 हजार हेक्‍टर बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या सहा लाख 36 हजार 146 आहे.

नगर : ""जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यापैकी 124 कोटी 19 लाखांचा निधी थेट बॅंकेत वर्ग करण्यात आला. आता दुसऱ्या टप्प्यातील निधीच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना आज पत्र पाठविण्यात आले. त्यामुळे लवकरात लवकर हा निधी उपलब्ध होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले. 

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनातर्फे जिरायती, बागायती आणि फळबागा मिळून चार लाख 54 हजार हेक्‍टर बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या सहा लाख 36 हजार 146 आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा हा अहवाल विभागीय आयुक्तांतर्फे शासनदरबारी दाखल झाला होता. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून 135 कोटी 55 लाख रुपयांचे अनुदान नुकतेच जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले होते. त्यापैकी 124 कोटी 19 लाखांचा निधी बॅंकेत वर्ग करण्यात आला. या मदतीचे वाटप तालुकास्तरावरून करण्यात येत आहे. 

गतवर्षी सोसला शिवाराने दुष्काळ 
गेल्या वर्षी जिल्ह्याने दुष्काळ सोसला. पशुधन जगविण्यासाठी 504 चाराछावण्या सुरू करण्यात आल्या. त्याचबरोबर पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या टॅंकरच्या संख्येने 873 असा विक्रमी आकडा गाठला. यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीला शिवाराचे डोळे मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले होते. सुरवातीची काही नक्षत्रे बरसल्यानंतर काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, सप्टेंबरच्या अखेरीस चित्रा व स्वाती नक्षत्रांच्या सरींनी शिवारात बरसातीचा उत्सव मांडला. 97 पैकी 97 महसूल मंडळांत दमदार पाऊस झाला. परतीच्या मॉन्सूनने यंदा 809.99 मिलिमीटर बरसत मागील 18 वर्षांच्या सरासरीचा विक्रम मोडला. ऑक्‍टोबर महिन्यात जिल्ह्यात 200 मिलिमीटर असा उच्चांकी पाऊस झाला. 

हातातोंडाशी आलेला घास हिरावला 
खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास यामुळे हिरावून घेतला गेला. पावसामुळे घटलेला जलस्तर वाढला आहे; मात्र बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, कपाशी, फळबागा आदी पिकांचे फड उद्‌ध्वस्त केले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली. राज्य शासनाला पाठविलेल्या 475 कोटींच्या अहवालानुसार, 135 कोटी 55 लाख रुपये हे पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी 124 कोटी बॅंकेत वर्ग झाले. 

तालुकानिहाय वाटप अनुदान (रुपये लाखांत) 
नगर-945.04 
पारनेर-807.89 
पाथर्डी-1946.05 
कर्जत-687.54 
श्रीगोंदे-857.54 
जामखेड-169.81 
श्रीरामपूर- 793.63 
नेवासे-1098.97 
शेवगाव-1461.19 
राहुरी-779.35 
संगमनेर-1025.54 
अकोले-1498.25 
कोपरगाव-828.02 
राहाता-656.19 

प्रशासनाचा पाठपुरावा सुरू 
नुकसानग्रस्तांसाठी 475 कोटी निधी मिळण्यासाठी प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांतर्फे सरकारकडे अहवाल पाठवला आहे. त्यानुसार 135 कोटी निधी प्राप्त झाला. त्यातील 91.62 कोटींचा निधी खर्च झाला. आता दुसऱ्या टप्प्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- अभिजित वांढेकर, नायब तहसीलदार 

निधी खात्यावर कधी होणार वर्ग 
माझ्या तीन एकर क्षेत्राचे पंचनामे झाले. पहिल्या टप्प्यातील निधीही तहसीलस्तरावरून बॅंकेत वर्ग झाला. मात्र, अद्याप तो निधी थेट खात्यावर वर्ग होण्यास विलंब होत असल्याची खंत आहे. 
- सचिन हारदे, नुकसानग्रस्त शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration follow up for grant