बाप्पांच्या निरोपासाठी प्रशासन सज्ज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

साताऱ्यात अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवसापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणरायाला निरोप देतात.

सातारा ः गणरायाची दहा दिवस भक्तिभावाने पूजा करणाऱ्या कार्यकर्त्यांची आता विसर्जन सोहळ्यासाठी धांदल सुरू झाली आहे. विसर्जन मिरवणुकीत गणरायाला निरोपही तेवढ्याच उत्साहात देण्यासाठी कार्यकर्त्यांचे सजावटीचे, वाद्यांचे नियोजन सुरू झाले आहे. साताऱ्यात अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवसापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणरायाला निरोप देतात. त्याअनुषंगाने प्रशासनाच्या स्तरावरही विसर्जनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. 

पालिकेच्या माध्यमातून गणपती, दुर्गादेवीच्या विसर्जनासाठी मुख्य विसर्जन ठिकाण म्हणून बुधवार नाका परिसरातील तळे तसेच घरगुती गणपतीसाठी पालिकेचा जलतरण तलावासह विविध प्रभागांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. सातारा शहर व तालुक्‍यातील विसर्जन मिरवणुकीसाठी 650 पोलिसांची बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

भाविकांनी श्री गणेशाचे स्वागत धुमधडाक्‍यात केले आहे. घराघरांत तसेच सार्वजनिक स्वरूपात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. घरगुती गणरायाचे विसर्जन करण्यासाठी पालिकेने पूर्वीच्या जलतरण तलावाबरोबरच कृत्रिम तळ्यांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये सदरबझार दगडी शाळा, कल्याणी हायस्कूलनजीक, हुतात्मा स्मारक आदींचा समावेश आहे. याबरोबरच मंगळवार तळे, फुटका तलाव, रामाचा गोट (शनि मंदिर), न्यू इंग्लिश स्कूल चौक, गुरुवार पेठेतील शिर्के हौद, रविवार पेठेतील गुरवे काच कारखानानजीक घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे हौद ठेवण्यात येणार आहेत. तसेच निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच संगम माहुली येथे कृष्णा नदीत विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदा पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती व दुर्गादेवीच्या मूर्ती विसर्जनासाठी मुख्य विसर्जन ठिकाण बुधवार नाका येथील जिल्हा परिषदेच्या शेतीशाळेतील जागेत गतवर्षीच्या ठिकाणीच कृत्रिम तळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. या तळ्यात सुमारे 70 लाख लिटर इतकी पाणी साठवण क्षमता आहे. त्याबरोबरच विसर्जन तळ्यानजीक मंडप, छोट्या आकाराचे गणपती ठेवण्यासाठी मचाण, विद्युत यंत्रणा उभारण्यात येणार आहे. गणपतीच्या विसर्जनासाठी पालिका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची दिवस-रात्र नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पालिकेतून देण्यात आली. 

गणरायांच्या विसर्जनाचे नियोजन 
- बुधवारी (ता. 11) 40 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या "श्रीं' चे विसर्जन 
- गुरुवारी (ता.12) 190 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या "श्रीं' चे विसर्जन 
- बहुतांश मंडळांनी मोठ्या उंचीचे गणराय विसर्जन न करण्याचा घेतला निर्णय 
- विसर्जनासाठी क्रेनची सुविधा 
-मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्ही वॉच 
- ढोल-ताशा पथकांचे मुख्य आकर्षण 
- पालिका, राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांकडून मंडळांचे मिरवणूक मार्गावर स्वागत कक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration ready for Ganesh immersion