दत्तक गावांपुढे विद्यापीठाने टेकले हात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने 2016-17 मध्ये दत्तक घेतलेल्या सहा गावांना विकासकामांसाठी प्रत्येकी 70 हजारांचा निधी दिला. त्यानंतर झालेल्या कामांचा हिशेब देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीला विद्यापीठाने पत्र पाठविले, तोंडी सूचना केल्या. मात्र, दोन वर्षांचा कालावधी संपत आला तरीही या गावांकडून खर्चाचा हिशेबच मिळाला नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शासनाच्या आदेशानुसार विद्यापीठाने 2014-15 मध्ये बीबी दारफळ व हिरज (ता. उत्तर सोलापूर), मळेगाव (ता. बार्शी), वाळूज (ता. मोहोळ), निमगाव टें. (माढा) आणि होनमुर्गी (दक्षिण सोलापूर) या गावांची निवड दत्तक ग्राम योजनेत केली. प्रारंभी या गावांमधील विकासकामांचे आराखडे तयार करण्यात आले. त्यानंतर गावातील अत्यावश्‍यक कामांसाठी विद्यापीठ फंडातून निधीही दिला. त्यानुसार 2016-17 मध्ये या गावांना प्रत्येकी 70 हजार रुपये दिले, त्यातून कामेही करण्यात आली. परंतु, विद्यापीठाने झालेल्या कामांचा अधिकृत हिशेब संबंधितांकडे मागितला. त्याबाबत सरपंच, ग्रामसेवकांना पत्र पाठविले, तसेच वारंवार तोंडी सूचना दिल्या. मात्र, दोन दिवसांत हिशेब देतो म्हणत आता दोन वर्षांचा कालावधी संपला, तरीही हिशेब मिळाला नसल्याचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. मंगलमूर्ती धोकटे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

आता पैसे नाहीत तर श्रमदानातून कामे
विद्यापीठाच्या पुढाकारातून प्रत्येक पाच वर्षाला पाच गावे दत्तक घेऊन विकासकामे करण्याचा शासनाचा निर्णय आहे. त्यानुसार प्रथमच 2014-15 मध्ये विद्यापीठाने पाचऐवजी सहा गावे दत्तक घेतली.

गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा प्रतिसाद पाहून विद्यापीठाने पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावाला 70 हजार रुपयांचा निधी दिला. त्यातून कामे पूर्ण होऊन त्या कामांचा हिशेब मिळाल्यानंतर आणखी निधी देण्याचे नियोजन होते. मात्र, गावांनी हिशेबच न दिल्याने आता या गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून गावकऱ्यांनी सुचविलेली कामे श्रमदानातून करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याचे प्रा. मंगलमूर्ती धोकटे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Adopt Village Issue Development Fund University