'इकोफ्रेंडली बाप्पा' साठी आगाऊ मागणी...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

शाडू- कागदाच्या लगद्याच्या मूर्ती, पर्यावरण रक्षणासाठी वाढतोय पुढाकार
कोल्हापूर - यंदाच्या गणेशोत्सवासाठी आता मूर्ती तयार करण्याची धांदल सुरू झाली असून "इकोफ्रेंडली बाप्पा‘साठी आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना यंदाही मागणी वाढली असून सार्वजनिक मंडळांनीही आता अशा मूर्तींसाठी पुढाकार घेतला आहे.

शाडू- कागदाच्या लगद्याच्या मूर्ती, पर्यावरण रक्षणासाठी वाढतोय पुढाकार
कोल्हापूर - यंदाच्या गणेशोत्सवासाठी आता मूर्ती तयार करण्याची धांदल सुरू झाली असून "इकोफ्रेंडली बाप्पा‘साठी आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना यंदाही मागणी वाढली असून सार्वजनिक मंडळांनीही आता अशा मूर्तींसाठी पुढाकार घेतला आहे.

येथील चेतना विकास मंदिर संस्थेकडे कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना मागणी वाढत असल्याने चेतना शाळेत आता इकोफ्रेंडली मूर्ती तयार करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. चेतना शाळा हे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी इकोफ्रेंडली मूर्तीची परंपरा जपलेल्या अनेक कारागीर व संस्थांकडेही अशीच परिस्थिती यंदा आहे. नऊ इंचापासून ते पाच फुटांपर्यंतच्या मूर्ती येथे उपलब्ध आहेत. नऊ इंची मूर्तीसाठी अर्धा ते पाऊण किलो, अडीच फूट मूर्तीसाठी पंधरा किलो तर पाच फूट मूर्तीसाठी पंचेचाळीस किलो कागदाचा लगदा लागतो.

कागदी लगद्याची मूर्ती असली तरी ती मजबूत असते. ती विसर्जित केली तरीही पाणी प्रदूषित होत नाही. तसेच पाण्याने भरलेल्या बादलीत विसर्जन केले की ते पाणी झाडांसाठी खत म्हणून वापरता येते. उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाशी नाते जोडण्याचे काम येथील काही संस्थांनी हाती घेतले आहे. तीन वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी कागदाच्या पाच फुटांच्या मूर्तीही विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. गेल्या वर्षी सहा मंडळांनी मूर्ती नेल्या. यंदा दहा मंडळांनी नोंदणी केली आहे. घरगुती मूर्तीसाठी इचलकरंजीच्या मनोरंजन मंडळाने अडीचशे मूर्तींची आगाऊ नोंदणी गेल्या वर्षीच केली आहे.

शाडूच्या मूर्ती
कोल्हापूर शहरात 2013 मध्ये मागणीनुसार 5000 शाडू मूर्ती तयार होत्या. निसर्गमित्र संस्थेकडे प्रत्येकवर्षी गणेशोत्सवापूर्वी लोकांना मूर्ती नोंदणीसाठी आवाहन करते. 2013 ला एकट्या निसर्गमित्र संस्थेकडून दीड हजार मूर्ती भाविकांनी नेल्या. 2014 ला ही संख्या सतराशेवर आली. गेल्या वर्षी एकट्या "निसर्गमित्र‘ संस्थेकडून ही संख्या एकवीसशेवर गेली तर यंदा हा आकडा अडीच हजारांवर जाणार आहे. यंदा किमान दहा हजारांवर शाडूच्या मूर्ती एकट्या शहरात तयार होणार आहेत.

Web Title: Advance demand for the ' eco friendly Bappa' ...!