अॅड. प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा लढविणार ?

तात्या लांडगे
शनिवार, 7 जुलै 2018

सत्तेत जाण्याऐवजी सत्ताच संपादन करायची, असा हेतूही त्यांनी यावेळी स्पष्ट केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मात करत अॅड. शरद बनसोडे मोदी लाटेत खासदारकीच्या खुर्चीवर विराजमान झाले. परंतु, सद्यस्थितीत त्यांच्याविषयी सोलापूर मतदारसंघात प्रचंड नाराजी असल्याची चर्चा आहे.

सोलापूर : भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध सुरु केल्याची चर्चा आहे. त्यानुसार त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित व वंचित समाजाला एकसंघ करण्यासाठी दौरा सुरु केला आहे. 14 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात आपला राजकीय हेतू असल्याचे त्यांनी सोलापुरात स्पष्ट केले. ते ऑगस्ट महिन्यात पुन्हा सोलापूर दौऱ्यावर असून त्यामध्ये त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. 

सत्तेत जाण्याऐवजी सत्ताच संपादन करायची, असा हेतूही त्यांनी यावेळी स्पष्ट केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मात करत अॅड. शरद बनसोडे मोदी लाटेत खासदारकीच्या खुर्चीवर विराजमान झाले. परंतु, सद्यस्थितीत त्यांच्याविषयी सोलापूर मतदारसंघात प्रचंड नाराजी असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून राज्यसभेचे खासदार अमर साबळे खासदारकीसाठी प्रयत्न करत असल्याची आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचीही एमआयएमकडून लोकसभा लढणार असल्याची चर्चा आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केल्याने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. 

त्यातच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अॅड. आंबेडकर यांना सोलापूरमधून लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह केला आहे. त्याबाबत उद्या (रविवारी) सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. 14 ऑगस्टनंतर अॅड. आंबेडकर सोलापुरात स्वत: उमेदवारीची घोषणा करतील, असा विश्‍वास कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केला आहे.

Web Title: Advt Prakash Ambedkar might fight the Solapur Lok Sabha