अध्यक्षपद 15 वर्षांनंतर खुले झाल्याने चुरस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

अध्यक्षपद मिळालेले तालुके... 

आतापर्यंत कोरेगाव, कऱ्हाड, पाटण, माण, सातारा, जावळी व महाबळेश्‍वर या तालुक्‍यांत यापूर्वी एकवेळच अध्यक्षपदांची संधी दिली गेली आहे. आतापर्यंत अध्यक्षपद मिळालेले तालुके : फलटण : दोन, कोरेगाव : एक, कऱ्हाड : एक, पाटण : एक, माण : एक, सातारा : एक, वाई : चार, खटाव : तीन, जावळी : एक, महाबळेश्‍वर : एक. 

सातारा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर आजवर अनेक दिग्गज व अनुभवी सदस्यांनी काम पाहिले. सुरवातीच्या काळात आमदार व खासदारकी व्हाया जिल्हा परिषद अध्यक्षपद अशीच स्थिती होती. पण, आरक्षण बदलले आणि नव्या चेहऱ्यांना अध्यक्षपदावर काम करता आले. गायत्रीदेवींनंतर पाच महिला अध्यक्ष झाल्या. 2002 नंतर म्हणजे तब्बल 15 वर्षांनंतर प्रथमच अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली. चुरस आणि विरोध असूनही संजीवराजेंना अध्यक्ष करताना रामराजे कोणती चाल खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर अनेक मोठ्या व दिग्गज नेत्यांनी काम केले. तर काहींच्या अवगुणीपणामुळे त्यांची चांगली-वाईट चर्चाही झाली. पूर्वी पाच वर्षे एकच अध्यक्ष असायचा, आता मात्र, सव्वा वर्ष, अडीच वर्षे असे टप्पे पडले असून, प्रत्येक इच्छुकाला संधी मिळावी, यासाठी राजकीय नेत्यांनी "ऍडजेस्टमेंट' केली. पण, ही "ऍडजेस्टमेंट' आता नेत्यांची डोकेदुखी ठरली आहे. अध्यक्षपद खुले असल्याने इच्छुकांनी जिल्ह्यातील नेत्यांऐवजी पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तर काहींनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंपर्यंत जाऊन मोर्चेबांधणी केलेली आहे. 

जिल्हा परिषदेचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान कऱ्हाडचे (कै.) यशवंतराव पाटील-पार्लेकर यांना मिळाला. 1962 ते 67 पाच वर्षे ते अध्यक्ष राहिले. त्यांच्यानंतर मरळीचे (ता.पाटण) भागवतराव देसाई हे सहा वर्षे अध्यक्ष होते. त्यानंतर नांदगावचे (ता. सातारा) बाबूराव घोरपडे यांनीही सहा वर्षे अध्यक्षपदावर काम केले. त्यानंतर गिरवीचे (ता. फलटण) सूर्याजीराव ऊर्फ चिमणराव कदम हे एक वर्ष अध्यक्ष झाले. त्यानंतर बोपेगावचे (ता. वाई) लक्ष्मणराव पाटील हे सर्वाधिक अकरा वर्षे अध्यक्ष राहिले. त्यांच्या काळातच शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी व सदस्यांना मुदतवाढ द्यायची नाही, असा अध्यादेश काढला. श्री. पाटील यांच्या कार्यकाळात "ट्री गार्ड' गैरव्यवहाराचे प्रकरण गाजले होते. त्याची विधानसभेतही चर्चा झाली होती. 

लक्ष्मणराव पाटील यांच्यानंतर सिद्धेश्‍वर कुरोलीचे (ता. खटाव) ऍड. सुभाषराव देशमुख हे पाच वर्षे अध्यक्ष झाले. त्यानंतर मात्र, पाच वर्षांचा कार्यकाल बाजूला पडला आणि खेड-नांदगिरीचे (ता. कोरेगाव) शिवाजीराव महाडिक, आनेवाडीचे (ता. जावळी) जयसिंगराव फरांदे, चिंधवलीचे (ता. वाई) नारायणराव पवार यांना एक एक वर्षे अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. नारायणराव पवारांनंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर प्रथमच गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींच्या माध्यमातून महिलांना संधी मिळाली. त्या अडीच वर्षे अध्यक्ष होत्या. त्यानंतर अध्यक्षपदाचे आरक्षण बदलले आणि बावधनच्या (ता. वाई) हेमलता ननावरे यांना एक वर्ष संधी मिळाली. त्यांच्यानंतर पुसेसावळीच्या (ता. खटाव) भाग्यश्री भाग्यवंत अडीच वर्षे अध्यक्ष झाल्या. 

डिसेंबर 2009 मध्ये टेकवलीच्या (ता. महाबळेश्‍वर) ज्योती जाधव या अध्यक्ष झाल्या. त्या एकमेव अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गातून निवडून आल्या होत्या. त्यांना अडीच वर्षे संधी मिळाली. त्यानंतर बावधनच्या (ता. वाई) अरुणादेवी पिसाळ यांना संधी मिळाली. 2014 मध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण बदलले आणि माणिकराव सोनवलकर (ता. फलटण) हे अध्यक्ष झाले. सोनवलकरांनंतर पर्यंतीचे (ता. माण) सुभाष नरळे अध्यक्ष झाले, ते आतापर्यंत आहेत. यावेळेस अध्यक्षपदाचे आरक्षण खुले असून या पदासाठी फलटणचे संजीवराजे नाईक-निंबाळकर, कऱ्हाडचे मानसिंगराव जगदाळे आणि साताऱ्याचे वसंतराव मानकुमरे या तिघांत चुरस आहे. चुरस, विरोध यातून मार्ग काढत संजीवराजेंना अध्यक्ष करण्यात रामराजे कोणती चाल खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अध्यक्षपद मिळालेले तालुके... 

आतापर्यंत कोरेगाव, कऱ्हाड, पाटण, माण, सातारा, जावळी व महाबळेश्‍वर या तालुक्‍यांत यापूर्वी एकवेळच अध्यक्षपदांची संधी दिली गेली आहे. आतापर्यंत अध्यक्षपद मिळालेले तालुके : फलटण : दोन, कोरेगाव : एक, कऱ्हाड : एक, पाटण : एक, माण : एक, सातारा : एक, वाई : चार, खटाव : तीन, जावळी : एक, महाबळेश्‍वर : एक. 

Web Title: After 15 year president post open