करार संपल्याने "एटीपी' मशिन बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

सातारा - महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी वीज बिल भरणा सुलभ व्हावे यासाठी सुरू केलेल्या "एटीपी' (एनी टाइम पेमेंट) मशिनची सुविधा सातारा जिल्ह्यात खंडित झाली आहे. त्यामुळे बिले भरण्यासाठी प्रतापगंज पेठेतील कार्यालयासमोर नागरिकांच्या भर ऊन-पावसात रस्त्यावर लांबच्या लांब रांग लागत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यावर लागणारी ही रांग नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. 

सातारा - महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी वीज बिल भरणा सुलभ व्हावे यासाठी सुरू केलेल्या "एटीपी' (एनी टाइम पेमेंट) मशिनची सुविधा सातारा जिल्ह्यात खंडित झाली आहे. त्यामुळे बिले भरण्यासाठी प्रतापगंज पेठेतील कार्यालयासमोर नागरिकांच्या भर ऊन-पावसात रस्त्यावर लांबच्या लांब रांग लागत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यावर लागणारी ही रांग नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. 

जिल्ह्यात सातारा शहर, सातारा ग्रामीण व कऱ्हाड येथे "एटीपी' मशिनची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. येथील प्रतापगंज पेठेतील कार्यालयालगत बसवण्यात आलेल्या या मशिनमुळे शेकडो ग्राहक ऑनलाइनला "कनेक्‍ट' होत वीज देयके भरणा करत होते. वीज ग्राहक त्यांच्या सोयीनुसार वीज बिलाचे पैसे भरत होते. तसेच बिले भरण्यासाठी लागणारी तासन्‌ तास रांग खंडित करण्यासाठी व वेळेची बचत करण्यासाठी महावितरणने उचललेले पाऊल शहरासह ग्रामीण भागात फायदेशीर ठरले. ग्राहकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाल्याने महावितरणला बॅंका, पतसंस्था किंवा टपाल कार्यालयांवर अवलंबून राहावे लागत नव्हते. कंत्राटदाराचा करारनामा संपल्याने सध्या जिल्ह्यातील "एटीपी' मशिनची सुविधा बंद करण्यात आली आहे. याबाबत महावितरण कार्यालयांमधून ग्राहकांना ही माहिती दिली जात आहे. "एटीपी' मशिनची सुविधा बंद झाल्याने प्रतापगंज पेठेतील कार्यालयात वीज बिल भरण्यासाठी येणाऱ्या शेकडो ग्राहकांची अडचण झाली आहे. परिणामी कार्यालयासमोरील वीज बिल भरणा केंद्रासमोर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. ग्राहकांना मुदतीत बिले भरता यावीत यासाठी महावितरणने शनिवारी (ता. 28) आणि रविवारी (ता. 29) सर्व केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु, सॉफ्टवेअरमधील अडचण सांगत काही केंद्रे दुपारी एक वाजता बंद ठेवण्यात आली होती. 

नवीन वीज बिल भरणा केंद्र सुरू करणार 
ग्राहकांचा वेळ व पैशाची बचत व्हावी यासाठी महावितरणने मोबाईल ऍप आणि संकेतस्थळावर वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. वडूज, सातारा, फलटण विभागात फिरत्या वाहनांद्वारे वीज बिले स्वीकारली जात आहेत. ज्या ठिकाणी एटीपी मशिन सुविधा होती, तेथे विशेषतः सातारा शहर येथे नवीन वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्यात येत आहेत. 

आगामी काळात कऱ्हाड येथे ते सुरू होईल. ऑनलाइन बिले भरताना यापूर्वी कराची रक्कम भरावी लागत होती. आता बिलावर जितकी रक्कम आहे, तितकीच रक्कम भरू शकण्याची सुविधा आहे. 
- निशिकांत राऊत, प्रभारी जनसंपर्क अधिकारी, बारामती मंडल 

Web Title: After the agreement ATP machine off