...आता शेतकऱ्यांच्या सहमतीनंतरच ऊसबिलातून कर्जवसुली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

- शेतकऱ्याच्या सहमतीनंतरच ऊसबिलातून कर्जवसुली 
- दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर "डीसीसी'ने घेतला निर्णय

सोलापूर- शेतकऱ्यांच्या ऊस बिलामधून कर्जाची वसुली करण्यासाठी आता संबंधित शेतकऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. शेतकऱ्याची सहमती असेल तरच कर्जवसुलीची रक्कम शेतकऱ्याच्या ऊस बिलातून कपात केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक किसन मोटे यांनी शाखाधिकारी, बॅंक इन्स्पेक्‍टर, सीनियर बॅंक इन्स्पेक्‍टर यांना काढले आहे.

राज्यात उद्‌भवलेल्या दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश राज्य सरकारच्या महसूल विभागाने दिले आहेत. महसूल विभागाच्या आदेशानुसार जिल्हा बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील गळीत हंगामाला वेग आला आहे.

दुष्काळ आणि हुमणीच्या संकटातून शेतकरी आपला ऊस प्रथम प्राधान्याने गाळपाला पाठवत आहेत. यंदा पावसाने सपशेल पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. परतीचा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने गाळप झालेल्या उसाचे बिल जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतात. ऊस बिलातून कर्जाची वसुली होईल की काय? याचीच धास्ती शेतकऱ्यांना लागली होती. बॅंकेच्या सरव्यवस्थापकांनी काढलेल्या या पत्रामुळे जिल्ह्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Web Title: after the consent of the farmers the loan was recovered from bill