प्रसूतीनंतर महिलेचा  मासा बेलेवाडी आरोग्य उपकेंद्रात मृत्यू

प्रसूतीनंतर महिलेचा मासा बेलेवाडी आरोग्य उपकेंद्रात मृत्यू

सेनापती कापशी/ गडहिंग्लज - मासा बेलेवाडी (ता. कागल) येथील आरोग्य उपकेंद्रात प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाला. पल्लवी दिलीप जाधव (वय २२, रा. कासारी, ता. कागल) असे तिचे नाव आहे. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तिला गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, तिचा अगोदरच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्‍टरांनी सांगितले. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी गडहिंग्लजमध्येच आंदोलन सुरू केले. 

मृत्यूस कारण ठरलेल्या आरोग्य सेविका, पर्यवेक्षक व डॉक्‍टरांना निलंबित करा, नुकसान भरपाई द्या, अशी मागणी नातेवाईकांनी केली. मागणी पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेऊन त्यांनी उपजिल्हा रुग्णालयासमोरच ठिय्या आंदोलन केले. अखेर चौकशीची व शासन नियमानुसार माता मृत्यूअंतर्गत नुकसान भरपाईसंदर्भात लेखी हमी दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआरकडे नेण्यास परवानगी दिली.

याबाबत पती दिलीप जाधव यांनी केलेले आरोप असे - पल्लवीला पहाटे चारच्या सुमारास मासा बेलेवाडी उपकेंद्रात दाखल केले. सकाळी साडेसातला प्रसूती झाली. त्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली. येथे डॉक्‍टर हजर नसतानाही उपचार करण्यात आले. साडेनऊच्या सुमारास पल्लवीला चक्कर आली; तेव्हा तिला रुग्णवाहिकेतून गडहिंग्लजकडे हलविले. त्याचवेळी तिचा मृत्यू झाला असतानाही नातेवाईकांना कल्पना दिली नाही. उलट बाळाची प्रकृती गंभीर असल्याचा बनाव करून त्या दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयाकडे नेत आहे, असे सासू छबूताई जाधव व शेजारी सुलाबाई माळवी यांना सांगितले.

पती जाधव यांना हजर असूनही काहीही कळू दिले नाही. मुळात उपकेंद्रातच पल्लवीचा मृत्यू होऊनही संबंधित सेविका व पर्यवेक्षकाने याची कल्पनाच दिली नसल्याचा आरोपही श्री. जाधव यांनी केला आहे.

दरम्यान, गडहिंग्लज येथे या घटनेची माहिती मिळताच जनता दलाचे तालुका अध्यक्ष बाळेश नाईक, नगरसेवक उदय कदम, उपजिल्हा रुग्णालयात पोहचले. त्यांनी नातेवाईकांना सोबत घेऊन रुग्णालयासमोर ठिय्या मांडला.

संबंधित आरोग्य सेविका, पर्यवेक्षक व डॉक्‍टरांना निलंबित करून नुकसानभरपाई मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन इनकॅमेरा करण्याचा आग्रह पती जाधव यांच्यासह नातेवाईकांनी धरला. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे यांनी नातेवाईकांशी चर्चा केली.

शवविच्छेदनासाठी नियमित स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने व तक्रार असल्याने सीपीआरला तज्ज्ञ समितीसमोर शवविच्छेदन करावे लागेल, असे स्पष्ट केले. परंतु, कारवाई व भरपाईची लेखी हमी मिळाल्याशिवाय मृतदेह हलवणार नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. अखेर डॉ. आंबोळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून लेखी हमी नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले.

दुसरे संकट
दिलीप जाधव यांना अडीच वर्षांची मुलगी आहे. आता मुलगा झाला आहे. त्यांच्या भावाचे चार वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले आहे. त्यासाठी खूप पैसा खर्च झाला. घरी विधवा भावजय, त्यांची मुले, आजारी वडील व आई आहे. सौ. पल्लवी यांच्या मृत्यूने या गरीब कुटुंबावर चार वर्षांत दुसरे संकट ओढवले आहे.

रुग्णांच्या जीवाशी खेळ
आरोग्य उपकेंद्रात प्रसूतीचे अधिकार आहेत का, असा प्रश्न करून जिल्हा परिषद सदस्या सौ. शिल्पा खोत यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाईची लेखी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. कापशीच्या आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्त आहेत. मागणी करूनही येथे डॉक्‍टर मिळालेले नाहीत. यामुळे येथील रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. याला जिल्हा प्रशासन जबाबदार आहे, असे आरोपही या पत्रात आहेत.

पल्लवीचा मृत्यू प्रसूतीनंतर मासा बेलेवाडीतील आरोग्य उपकेंद्रात झाला आहे. तरीसुद्धा पल्लवी व मुलाला उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठवून दिले होते. रुग्णालयासमोर बसून नातेवाईक कारवाई व भरपाईची लेखी हमी मागत होते; परंतु कारवाईचे अधिकार आपल्याला नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या सुचनेनुसार लेखी पत्र नातेवाईकांना दिले आहे.
- डॉ. डी. एस. आंबोळे;
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज

सीपीआरमध्ये तणाव 
जाधव यांचा मृतदेह सायंकाळी साडेसातच्या सुमारास सीपीआरमध्ये आणला. त्यानंतर तो येथील शवागृहात ठेवण्यात आला. येथे नातेवाईकांनी इन कॅमेरा शवविच्छेदन करावे, अशी मागणी केली. त्यामुळे सीपीआरमधील शवविच्छेदन विभागाजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस नातेवाईकांची रात्री उशिरापर्यंत समजूत काढत होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com