Video : गावाभोवती पडला मृत जनावरांचा खच

 मतीन शेख
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूरजवळच्या प्रयाग चिखली या गावाभोवती आता मृत जनावरांचा खच पडला आहे. यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

कोल्हापूर - पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूरजवळच्या प्रयाग चिखली या गावाभोवती आता मृत जनावरांचा खच पडला आहे. यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. पुराने वेढा दिल्यानंतर चिखलीतील लोकांनी दावणीची जनावरे सोडून दिली होती. या शेकडो जनावरांनी पुरात जीव गमावला आहे. गावकरी कसेबसे उरलेली जनावरे जगवण्याचा प्रयत्न करत आहेत.

बचाव कार्यात चिखलीतील सहा हजार लोकांना सोनतळी येथे हलवण्यात आलं आहे. आपल्या जनावरांसाठी अनेकांनी गावाबाहेर पडण्यास नकार दिला होता. गाव पाण्याखाली गेल्यानंतर गावकऱ्यांनी नाईलाजाने दावणीची जनावरे सोडून दिली. त्यातील बहुतेक पुरात वाहून गेली. दावणीला बांधलेली जनावरे बुडून मृत झाली. या मृत जनावरांचा खच गावाभोवती पडलेला आहे. त्यांची दुर्गंधी पसरू लागली आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

अनेकांनी घरांच्या छतावर आपली जनावरे नेऊन ती वाचविली. त्यांच्यावर जिल्हा प्रशासन आणि गोकूळ दूध संघामार्फत उपचार केले जात आहेत. मृत जनावरांची विल्हेवाट पुराच्या पाण्यात लावली जात आहे. आता वाचलेली जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे. कारण त्यांना खाण्यासाठी वैरण उपलब्ध नाही. दुसरीकडे गावाभोवती पाण्याचा वेढा कायम असल्याने रोजचे दूधही डेअरीला पाठवता येत नाही. ते पुरातच ओतून द्यावे लागत आहे.

जनावरांनीच आमचा संसार उभा केला. दुग्ध व्यवसाय हा आमच्या जगण्याचा आधार आहे. काही जनावरे वाहून गेली. उरलेल्या जनावरांना सोडून जाणे मनाला पटत नाही. म्हणून आम्ही त्यांची साथ सोडलेली नाही, गाव सोडलेले नाही.
- सुभाष पाटील, गावकरी, प्रयाग चिखली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Flood Dead animal around the village