esakal | लॉकडाउननंतर मिरजकर पुन्हा लागले गर्दी जमवू 
sakal

बोलून बातमी शोधा

After the lockdown, Mirajkar started gathering again

दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, मार्केट परिसरातील भाजी बाजार आणि मुख्य रस्त्यावरील गर्दीमध्ये सोशल डिस्टन्स राखला जात नसल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.

लॉकडाउननंतर मिरजकर पुन्हा लागले गर्दी जमवू 

sakal_logo
By
शंकर भोसले

मिरज : आठ दिवसांच्या लॉकडाउननंतर पुन्हा वैद्यकीयनगरी धावू लागली आहे. शहरातील दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, मार्केट परिसरातील भाजी बाजार आणि मुख्य रस्त्यावरील गर्दीमध्ये सोशल डिस्टन्स राखला जात नसल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. सध्या मिरज शहरात शासन दरबारी 426 कोरोना बाधित रूग्णांची नोंद आहे. तर 21 जणांचा बळी गेला आहे. ही सध्यस्थिती असताना पुन्हा मिरजकर गर्दी जमवू लागले आहेत. 

यातच आलेली बकरी ईद यामुळे देखिल शहरात साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्स न राखता गर्दी केली आहे. वैद्यकीयनगरीत सध्या 21 कंटेनमेंट झोन आहेत. या कंटेनमेंट झोनमध्ये रॅपिड टेस्ट घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेकडून सुरू आहे. यामध्ये दिवसागणिक रूग्ण संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत असताना पुन्हा सोशल डिस्टन्स न राखणे हे मिरजकरांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. याकडे महापालिकेच्या भरारी पथकाने दुर्लक्ष केल्याचे दिसले. मिरज शहरात बहुसंख्येने मुस्लिम समाज आहे.

आजच्या बकरी ईदच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी गर्दी होती. यामध्ये शहरातील मार्केट यार्ड परिसरात भरविला जाणार जनावरांचा बाजार प्रशासनाकडून रद्द केल्यामुळे आज नागरिकांनी रस्त्यावरच जनावरांचा बाजार मांडल्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली. या ठिकाणी वेळीच गांधी चौकीच्या पोलिसांनी धाव घेतल्यामुळे विक्रेत्यांनी आपला मोर्चा शहरातील उपगनरात वळविला. 

विक्रेत्यांना हटकले... 
मुस्लिम धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण मानला जाणारी बकरी ईदमुळे लॉकडाउन उठल्यानंतर नागरिकांनी साहित्य खऱेदीसाठी मार्केट परिसरात गर्दी केली होती. यावेळी पोलिस यंत्रणेकडून गर्दी आटोक्‍यात आणण्यासाठी विक्रेत्यांना हुसकावून लावले. 
 

बकऱ्यांना भाव कमी 
लॉकडाऊन आणि साध्या पध्दतीने साजरा होणारी बकरी ईद यामुळे बकऱ्यांचे दर उतरल्यामुळे शतेकरी आणि शेळीपालन व्यवसायकांना तोटा सहन करावा लागत आहे. 

पोलिस प्रशासनाकडून सुचना... 
बकरी ईदच्या पार्श्‍वभुमीवर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण न करता घऱीच थांबून वैयक्तिक नमाज पठण करून बकरी ईद साजरी करण्याच्या सुचना मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपसिंह गिल यांनी बैठकीद्वारे दिल्या आहेत. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली