"झेडपी'त राष्ट्रवादीनंतर भाजप 

विशाल पाटील - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

सातारा - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षीय सूत्रे बदलल्याने प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळाची चाल खेळली. मात्र, त्याचा परिणाम उमेदवार मिळविण्यावरही झालेला आहे. या लढाईत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक उमेदवार उभे केले असून, त्यापाठोपाठ भारतीय जनता पक्षाने आघाडी घेत 55 जागांवर उमेदवार दिले. शिवसेनेनेही आगेकूच करत तब्बल 54 जागांवर उमेदवारी दिली आहे. मात्र, साताऱ्यात राष्ट्रवादीचा विरोधक असणारा कॉंग्रेस पक्ष पिछाडीवर पडला आहे. 

जिल्हा परिषदेची रणधुमाळी शिगेला पोचल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मिनी मंत्रालय समजली जाणारी जिल्हा परिषदेची सत्ता मिळणे, सभागृहात प्रवेश मिळविण्यासाठी सर्वच पक्षांनी दमदार लढाई सुरू केली आहे. यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीही जोमाने कामाला लागली आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यावर्षी अर्ज दाखल करण्याचा उच्चांक गाठला गेला आहे. राष्ट्रवादीविरोधात आघाडी करण्यासाठी विरोधकांची तयारी सुरू होती. मात्र, भाजप-शिवसेनेची युती, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याने त्याचा परिणाम सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही दिसला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून आता स्वबळावर निवडणूक लढवली जात आहे. 

जिल्हा परिषदेसाठी 64 जागांसाठी ही लढाई होत असून, त्यामध्ये सर्वाधिक उमेदवार राष्ट्रवादीने दिले आहेत. स्वबळावर लढले जात असल्याने त्याचा परिणाम इतर पक्षांवर झालेला असून, त्यांना सर्वच जागांवर उमेदवार देता आले नाहीत. तरीही भाजप, शिवसेनेने आघाडी घेत अनुक्रमे 55 व 54 जागांवर उमेदवार दिले आहेत. दोघांनीही पक्ष चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. गत जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप, शिवसेनेने महायुती करत 25 जागांवर लढत दिली होती. भाजप काही ठिकाणी स्वतंत्रही लढली होती. या निवडणुकीत दोघेही स्वतंत्र लढत असताना दुप्पट जागांवर उमेदवार दिले आहेत. 

जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कॉंग्रेसला मात्र सर्वच जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. सातारा तालुक्‍यातून तर पक्षाचे चिन्हच "हद्दपार' झाले आहे. गत निवडणुकीत चार गटांतून कॉंग्रेसने चिन्हावर निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत सध्याच्या राजकीय स्थितीनुसार कऱ्हाड दक्षिणमध्ये राष्ट्रवादीबरोबर, तर फलटणला स्वाभिमानी आघाडीसह इतर पक्षांशी युती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

खरे स्वबळ निकालानंतर 
ज्या जागांवर उमेदवार मिळाले नाहीत, अशा जागांवर पुरस्कृत उमेदवारही देण्याची तयारी पक्षीय नेतेमंडळींची सुरू आहे. उमेदवारी देण्यात सर्वच पक्ष आघाडीवर असले तरी निकालानंतर कोण जिंकणार, कोणाला किती मते मिळणार, यावरच पक्षांचे "स्वबळ' दिसेल. 

Web Title: After NCP bjp in zp