एका महिन्यानंतर सापडला त्या दोघांचा मृतदेह ; मुले मात्र बेपत्ताच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

२८  किलोमीटरचा हा घाटरस्ता दाट वृक्षांनी व्यापलेला आहे. घाटात शक्‍यतो कोणाचे जास्त येणे-जाणे नसते. दरम्यान, जाधव दांपत्याच्या दोन्ही मुलांचा अद्याप काही ठावठिकाणा लागलेला नाही

मेढा : मार्ली घाटात (ता. जावळी, जि. सातारा) २० दिवसांपूर्वी आढळलेला पुरुषाचा मृतदेह आणि त्यानंतर काल रात्री याच घटात आढळलेल्या महिलेचा मृतदेह पती-पत्नीचे असल्याची प्राथमिक माहिती आज पुढे आली. हे दोघेही कुपवाड येथील असून, पुरुषाचे नाव तानाजी विठोबा जाधव (वय ५५) व महिलेचे नाव मंदाकिनी तानाजी जाधव असे आहे.

हेही वाचा - रो-रो फेरीबोटीचा आनंद सुरूच राहणार, प्रवाशांचा वाढताेय प्रतिसाद...

दरम्यान, तानाजी जाधव, मंदाकिनी जाधव व त्यांची दोन्ही मुले गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असल्याची फिर्याद कुपवाड पोलिसांत  काही दिवसांपूर्वी दाखल झाली होती. जाधव दांपत्याच्या दोन्ही मुलांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. 
जावळी तालुक्‍यातील दाट जंगलाने व्यापलेला मेढा-मार्ली 
घाट वाहतुकीसाठी अत्यंत दुर्मिळ समजला जातो. या घाटामध्ये क्वचित एखादे-दुसरे वाहन दिसून येते. या   घाटाचा फायदा घेत ११ ऑगस्टपूर्वी या घाटामध्ये अज्ञाताने पती-पत्नीला आणून एकाचवेळी खून करून दोघांचे मृतदेह दाट जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले की काय? अशा चर्चा सुरू आहे. 

मेढा पोलिसांना ११ ऑगस्ट रोजी  पुरुषाचा मृतदेह सापडला होता. सापडलेल्या मृतदेहाची प्रथमदर्शनी ओळख पटली नव्हती. काल दुसरा महिलेचा मृतदेह सापडेपर्यंत पहिल्या पुरुषाच्या मृतदेहाची नेमकी ओळख पोलिसांना पटलेली नव्हती. मात्र, काल महिलेच्या हाडाचा सापळा पोलिसांना आढळला, त्या वेळी पोलिसांनी आपला तपास गतिमान केला. त्यात दोन्ही मृतदेह हे पती-पत्नीचे असल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही पती-पत्नींचा खून नेमका कोणी केला? खून कोणत्या कारणातून केला? आदी तपासाचे आव्हान मेढा पोलिसांसमोर आहे. पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक अशोक पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक तात्या शिंदे, संजय शिर्के, इमरान मेटकरी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -  वेंगुर्लेवासीयांच्या चिंतेत वाढ, प्रशासनाचीही एकच धावपळ...

दोन्ही मुले बेपत्ताच

मेढा, दिवदेव, सायघर, भिलार रस्त्यावर मार्ली घाट लागतो. सुमारे २८  किलोमीटरचा हा घाटरस्ता दाट वृक्षांनी व्यापलेला आहे. घाटात शक्‍यतो कोणाचे जास्त येणे-जाणे नसते. दरम्यान, जाधव दांपत्याच्या दोन्ही मुलांचा अद्याप काही ठावठिकाणा लागला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after one month two dead bodies are found in marli ghat both are husband and wife but kids are not found