Vidhan Sabha 2019 : पक्षप्रमुखांच्या आदेशानंतरही शिवसेनेच्या कोठेंनी थोपटले दंड

तात्या लांडगे
Monday, 7 October 2019

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांना कारवाईचा इशारा देऊनही महेश कोठे यांनी आपल्याच उमेदवाराविरुध्द दंड थोपाटले आहे.

सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शब्द देऊनही
आपल्याला उमेदवारी न देता निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मागील 15- 20 वर्षांपासून पाहिलेले आमदारकीचे स्वप्न यंदाही अपूर्णच राहीले. मात्र, त्यातून त्यांनी पर्याय काढत बंडखोरी केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांना कारवाईचा इशारा देऊनही महेश कोठे यांनी आपल्याच उमेदवाराविरुध्द दंड थोपाटले आहे.

देशाचे माजी केंद्रीयगृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या लोकसभा
पराभवानंतर त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे हॅट्रीक करणार का, पराभवाच्या भितीने शहर मध्य विधानसभा मतदारसंघाऐवजी मोहोळ मतदारसंघातून लढणार अशा चर्चा मागील वर्षापासून सुरु आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून आता शहर मध्य मतदारसंघातून आता कॉंग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे, माकपकडून माजी आमदार नरसय्या आडम, शिवसेनेकडून माजी आमदार दिलीप माने, अपक्ष म्हणून महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे तर एमआयएमतर्फे फारुख शाब्दी निवडणूक लढत आहेत. तर वंचित बहूजन आघाडीनेही मुस्लीम उमेदवाराला संधी दिल्याने तो उमेदवार किती मते घेणार याचीही उत्सुकता आहे.

दरम्यान, कोठे व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे राजकीयदृष्ट्या कधी जमत नसल्याने ते शहर उत्तर विधानसभेतूनच लढतील असा अंदाज होता. विशेषत: त्या मतदारसंघात शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असूनही कोठे यांनी शहर मध्यमधून लढण्याचा निर्णय घेतला. आपल्याच उमेदवाराविरुध्द बंडखोरी केल्याने पक्ष त्यांच्याविरुध्द काय करावाई करणार, याचीही उत्सुकता लागली आहे.

सुशिलकुमार शिंदेंची शरद पवारांना गळ
लोकसभा निवडणुकीत आपल्याला पराभव पत्करावा लागला आता राष्ट्रवादीच्या उमेदवारीने मुलीला हॅट्रिक साधता येणार नाही. तर आमदार प्रणिती शिंदेंच्या पराभवानंतर जिल्ह्यात कॉंग्रेस टिकेल अशी परिस्थिती राहणार नाही, असे सुशिलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितले. त्यानुसार शरद पवार यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास सांगितले अन्‌ प्रणिती शिंदे यांच्या मार्गातील एक अडथळा दूर झाल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after order of Uddhav Thackeray Mahesh Kothe does not withdraws the form from solapur