तब्बल दहा वर्षांनंतर 'उजनी'कडून इतिहासाची पुनरावृत्ती

तब्बल दहा वर्षांनंतर 'उजनी'कडून इतिहासाची पुनरावृत्ती

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यावर यंदा वरुणराजाने मेहेरबानी केली आहे. त्याचा काही प्रमाणात नकारात्मक तर मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या या पावसाने बळीराजा आनंदला. जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण 100 टक्‍क्‍यांच्या पार झाले. आता डिसेंबर महिना चालू आहे, या महिन्यातही उजनी धरणाची टक्केवारी शंभरीच्या पुढेच आहे. यापूर्वी 2009, 2010 या वर्षी डिसेंबर महिन्यात उजनी शंभरी पार होती. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनंतर हा योग आल्याने यंदाच्या वर्षी उजनी धरणाने इतिहासाची पुनरावृत्ती केली असे म्हणता येईल. 

दुष्काळी ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे नंदनवन उजनी धरणामुळे झाले आहे. 1966 मध्ये भूमिपूजन झालेल्या उजनी धरणाचे काम तब्बल 14 वर्षांनी म्हणजेच 1980 मध्ये पूर्ण झाले. धरणाची साठवण क्षमता 117.24 टीएमसी इतकी आहे. त्यापैकी 53.58 टक्के साठा उपयुक्त तर 63.66 टीएमसी पाणीसाठा मृतावस्थेत आहे. धरणाचा मूळ प्रकल्प अहवाल पाहिला तर हा प्रकल्प बारमाही स्वरूपाचा होता. एक लाख 33 हजार 224 हेक्‍टर क्षेत्रासाठी 117 टीएमसी पाणीसाठा निर्माण करण्यात आला होता. प्रकल्पाचा पाणीवापर 83.94 टीएमसी आहे. यामध्ये प्रवाही सिंचन, उपसा सिंचन, बाष्पीभवन यासह बिगर सिंचनासाठी 5.35 टीएमसी पाणीवापर गृहीत धरले आहे. पिण्यासाठी 3.15 टीएमसी तर औद्योगिक वापरासाठी 2.20 टीएमसीची तरतूद मूळ प्रकल्पीय अहवालात करण्यात आली होती. 1986 मध्ये प्रकल्पाच्या पीक रचनेमध्ये बदल करून प्रकल्प आठमाही करण्यात आला. आठमाहीमध्ये पीक पद्धतीत उन्हाळी व बारमाही क्षेत्र पूर्णपणे वगळून त्याऐवजी खरीप व रब्बी हंगामी क्षेत्राचा समावेश केला. बदललेल्या पीक पद्धतीनुसार सिंचनाखालील क्षेत्र एक लाख 33 हजार 224 हेक्‍टरवरून एक लाख 82 हजार 383 हेक्‍टर करण्यात आले. त्याचा फायदा मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्‍यास झाला. आठमाही धोरणामुळे उन्हाळी हंगामात पाणी देणे, बारमाही पिकासाठी पाणी देण्याऐवजी हंगामी पिकासाठी वाढीव क्षेत्रास पाणी देण्याचे नियोजन केले. पिण्याच्या व औद्योगिक वापराच्या पाण्याची तरतूद मूळ प्रकल्प अहवालाप्रमाणेच ठेवली. 

उजनी प्रकल्पात नऊ उपसा सिंचन योजनांची तरतूदही करण्यात आली. त्यांचे क्षेत्र एक लाख 15 हजार 524 हेक्‍टर आहे. त्यासाठी 20.84 टीएमसी पाणी वापराचे नियोजन केले आहे. यावरून असे दिसून येते की उजनी धरणावरून दोन लाख 98 हजार 207 हेक्‍टर क्षेत्राला आठमाही पाणी देण्याचे नियोजन केले आहे. यापैकी काही उपसा सिंचन योजना सुरू झाल्या आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असते त्या वेळी उजनीच्या पाण्याने पिकाची तहान भागविता येते. 
उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात प्रकल्प सुरू होण्यासाठी आठ साखर कारखाने होते. या प्रकल्पामुळे वाढलेल्या उसामुळे त्याची संख्या आता 40 च्या घरात गेली आहे. प्रकल्प सुरू झाला त्या वेळी साखर कारखान्याचे एकूण उत्पन्न 29 कोटी इतके होते. त्यामध्ये आता जवळपास 100 पटीपेक्षा जास्तीने वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच उजनी धरणाला जिल्ह्याची वरदायिनी म्हटले जाते. शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणण्याचे काम धरणाने केले आहे. 2015 अखेर उजनी प्रकल्पावर 1290 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. पण, त्यावरून मिळालेले कृषी उत्पादन जवळपास 14 हजार कोटी इतके आहे. धरणावर सोलापूर, पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ, इंदापूर, बारामती, दौंड, उस्मानाबाद ही शहरे पाण्यासाठी अवलंबून आहेत. याशिवाय चिंचोली, बारामती, इंदापूर, कुरकुंभ, टेंभुर्णी या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळांना (एमआयडीसी) पाणीपुरवठा केला जातो. 

उजनी धरणाचे बुडीत क्षेत्रफळ 29 हजार हेक्‍टर इतके आहे. विस्तीर्ण जलाशयामुळे अनेक लोकांना मत्स्यव्यवसायामुळे रोजगार मिळाला आहे. धरणाच्या पाण्यावर 12 मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. भविष्यात सोलर पॅनेलद्वारे 100 मेगावॉट सौरऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. जिल्ह्यात 2012 व 2015 या दोन वर्षांमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. 2012 च्या दुष्काळात धरणात डिसेंबरमध्ये तीन टक्के तर 2015 मध्ये वजा पाच टक्के पाणीसाठा होता. मागील पाच-सात वर्षांचा इतिहास पाहिला तर यंदाच्या वर्षी धरणात झालेला पाणीसाठा खूपच दिलासादायक आहे असे म्हणता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com